shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी श्रीराम नवमी उत्सव २०२६ च्या अध्यक्षपदी संजय शिंदे; मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार



शिर्डी प्रतिनिधी: (तुषार महाजन)
 श्री साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डी नगरीत दरवर्षी अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा होणाऱ्या श्रीराम नवमी उत्सवाच्या २०२६ च्या उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी संजय शिंदे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल शिर्डीत एका विशेष कार्यक्रमात त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य सत्कार करण्यात आला. शिर्डीतील रामनवमी उत्सव हा देश-विदेशातील लाखो साईभक्तांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. या उत्सवाचे नेटके नियोजन करण्यासाठी दरवर्षी उत्सव समितीची स्थापना केली जाते. आगामी २०२६ च्या रामनवमी उत्सवाची धुरा संजय शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आल्याने शिर्डीतील ग्रामस्थ आणि भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संजय शिंदे यांच्या या निवडीबद्दल त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गफारखान पठाण, साई श्रद्धा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक हिम्मतराव होळकर, युवा नेते नानासाहेब शिंदे, साई श्रद्धा प्रतिष्ठानचे सल्लागार आसाराम वारे, रामनवमी उत्सव कमिटीचे खजिनदार विलास कोते तसेच साई श्रद्धा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व पत्रकार संजय महाजन आदी मान्यवरांच्या उपस्थितीत व त्यांच्या हस्ते संजय शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी संजय शिंदे यांना पुढील वाटचालीस आणि उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली व सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने २०२६ चा श्रीराम नवमी उत्सव अत्यंत भव्य, दिव्य आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडेल, असा सार्थ विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या सत्कार सोहळ्यास परिसरातील ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close