एरंडोल, प्रतिनिधी – जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर एरंडोलच्या सुपुत्राने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ७३ वी रँक मिळवून ऐतिहासिक यश संपादन केले आहे. एरंडोलचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करणाऱ्या आकाश ओम त्रिवेदी यांची भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) निवड झाल्याबद्दल संपूर्ण शहराच्या व एरंडोल शहर व तालुका गौरव समिती च्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
‘अभिमान एरंडोलचा…सन्मान कर्तृत्वाचा’ या संकल्पनेखाली होणारा हा गौरव सोहळा गुरुवारी, दि. १९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजता दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कॉलेज, म्हसावद नाका, एरंडोल येथे संपन्न होणार आहे.
या सोहळ्याचे अध्यक्षपद राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील भूषवणार असून, एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल चिमणराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
आकाश त्रिवेदी यांनी मिळवलेले हे यश केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण खान्देशासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. एका छोट्या शहरातून जिद्दीच्या जोरावर देशातील सर्वोच्च स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्याचा त्यांचा प्रवास आगामी पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
एरंडोलच्या या ऐतिहासिक सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शहरवासीय व पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गौरव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


