एरंडोल (प्रतिनिधी) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील ‘म्युझियम ऑफ कार्टून आर्ट’ चा चौथा वर्धापन दिन दि. १५ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या ऐतिहासिक सरस्वती हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात देशभरातील उत्कृष्ट व्यंगचित्रांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संग्रहालयाचे संस्थापक व जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार सुरज 'एस्के' श्रीराम होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रद्युम्न माहेश्वरी (मिक्स मिडीया) व आयमन मेहता (राह कल्चरल सेंटर) उपस्थित होते.
यावेळी एरंडोल येथील ‘मार्मिक’ व ‘दैनिक महाराष्ट्र सारथी’चे ज्येष्ठ व्यंगचित्रकार शरद महाजन यांचा व्यंगचित्र क्षेत्रातील प्रदीर्घ योगदानाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. तसेच घनश्याम देशमुख, लहु काळे, शरयु फरकांडे, अतुल पुरंदरे, विश्वास सूर्यवंशी, योगेंद्र भगत, आशिष विखार, गौतम दिवार, विवेक मगर, दिपाली जोशी आदी कलाकारांनाही स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना प्रद्युम्न माहेश्वरी यांनी “व्यंगचित्र म्हणजे समाजाचा आरसा आणि सारासार विवेक आहे” असे प्रतिपादन केले. तर आयमन मेहता यांनी व्यंगचित्र कलेचे सामाजिक भान जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
समकालीन राजकारण व समाजकारणावर भाष्य करणाऱ्या गाजलेल्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. संग्रहालयाच्या क्युरेटर डॉ. प्रिया गोहाड यांनी परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये व्यंगचित्र कलेची आवड निर्माण करण्यासाठी मार्गदर्शित भेटींचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त केला.
यावेळी प्रा. माधवी रेड्डी (मीडिया विभाग प्रमुख) यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमास कलाकार, विद्यार्थी व कला रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


