मुंबई : वडार समाजाच्या शिक्षण, रोजगार, संघटन आणि सर्वांगीण विकासासाठी वीर वडार एकता फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष विजय दादा गोरे यांनी लवकरच महाराष्ट्र दौरा करण्याची घोषणा केली आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून राज्यातील विविध भागांतील वडार समाजाशी थेट संपर्क साधून त्यांच्या समस्या, अडचणी आणि प्रलंबित प्रश्न जाणून घेण्यात येणार आहेत.

वडार समाजाच्या प्रश्नांची जाण ठेवून समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संघटनात्मक पातळीवर प्रयत्न करण्याचा निर्धार विजय दादा गोरे यांनी व्यक्त केला आहे. शिक्षणासाठी आर्थिक मदत, रोजगारासाठी मार्गदर्शन, युवकांना योग्य दिशा, समाजाची संघटनात्मक बांधणी तसेच विकासाच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यावर या अभियानात विशेष भर देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र दौऱ्यात समाजातील विविध घटकांशी संवाद साधून स्थानिक पातळीवरील प्रश्न समजून घेण्यात येणार असून, त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शासन व संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले.

“आपला सहभाग, आपल्या समाजाचा विकास!” या विचारातून संपूर्ण महाराष्ट्रातील वडार समाजाने एकत्र येऊन विकासाच्या वाटचालीत सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

वडार समाजाच्या शिक्षण, रोजगार, संघटन आणि विकासासाठी कार्यरत असलेल्या वीर वडार एकता फाउंडेशनच्या या महाराष्ट्र दौऱ्याकडे समाजातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. “चला एकत्र येऊया, वडार समाज घडवूया आणि भविष्य उज्ज्वल करूया!” असा संदेश या अभियानातून देण्यात आला आहे.
०००