शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा आहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
बुधवार २१ ऑक्टोबर २०२६
राहुरी : (सोनई) मढी येथे दर्शनासाठी आलेल्या सिन्नर तालुक्यातील कासारवाडी येथील भाविकांच्या चारचाकी वाहनाच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट मुळा पाटबंधारे विभागाच्या उजव्या कालव्यात कोसळली. घोडेगाव-सोनई रस्त्यावरील शनेश्वर दूध संघाजवळ असलेल्या कालव्याच्या पुलावर बुधवारी ही भीषण दुर्घटना घडली. कालव्यात मोठ्या प्रमाणात पाणी सुरू असल्याने कारमधील तिघांचा मृत्यू झाला, तर एकजण सुदैवाने बचावला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कार (क्रमांक एम एच ०३ बी डब्ल्यू ७८८४) मढी येथे दर्शनासाठी जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार पुलावरून थेट कालव्यात कोसळली. या दुर्घटनेत रणधीर भाऊसाहेब, केरू जगताप आणि सुभाष बिडवे यांचा मृत्यू झाला. या तिघांची पूर्ण नावे व अन्य तपशील मिळू शकले नाहीत. संदीप सदाशिव कदम हे या अपघातातून बचावले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. सोनई पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किशोर जाधव सहायक फौजदार मच्छिंद्र आडकित्ते पो. कॉ सुनील पालवे वजीर शेख कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. क्रेनच्या साहाय्याने कालव्यातील कार बाहेर काढण्यात आली. मृत व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नेवासा येथे पाठविण्यात आले. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघाताबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

