उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दातृत्वाला खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा सलाम; दुष्काळाच्या संकटात शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी!
शिर्डी प्रतिनिधी : (तुषार महाजन)
भीषण दुष्काळाच्या संकटामुळे शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबांची दिवाळी अंधारात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली असताना, उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे यांच्या पुढाकारातून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील तब्बल १० हजार कुटुंबांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. या उपक्रमामुळे अनेक गरजू कुटुंबांची दिवाळी गोड झाली असून, एकनाथ शिंदे यांच्या दातृत्वाला सलाम करतो, अशा शब्दांत खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच दुष्काळाच्या परिस्थितीत शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्यानंतर राज्यभर मदतीचे ट्रक रवाना करण्यात आले. त्याच अनुषंगाने शिर्डी मतदारसंघात आनंदाच्या शिध्याचे योग्य नियोजन करण्यात आले. मतदारसंघातील गावागावांमध्ये ५० ते १०० शेतकरी आणि कष्टकरी बांधवांचे गट तयार करून खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शिधा वाटप केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत त्यांच्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणीही केली.
सामान्य जनतेचा आवाज म्हणून ओळखले जाणारे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी या उपक्रमासाठी आपले दैनंदिन कार्यक्रम बाजूला ठेवून सलग १५ दिवस मतदारसंघाचा दौरा केला. गरजू कुटुंबांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. प्रत्येकाचे समाधान करणे शक्य नसले, तरी काही कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलवता आले, याचे समाधान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना खासदार वाकचौरे म्हणाले की, "आता मी एकटा नाही, तर पक्षाचे दोन आमदार माझ्यासोबत आहेत. महायुतीचीही साथ आहे. त्यामुळे आगामी काळात विकासकामांना अधिक वेग देऊन जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार आहोत."
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात शिवसेनेच्या शाखा बांधणीला सुरुवात करण्यात येणार असून, प्रत्येक शाखेचे नामकरण 'शेतकरी सेवा केंद्र' असे करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी आणि तक्रारी या केंद्रांमध्ये लेखी स्वरूपात द्याव्यात. शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नावर आणि अडचणीवर पक्ष खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच संकटाच्या काळात कोणत्याही शेतकऱ्याने खचून जाऊ नये किंवा आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊ नये, असे भावनिक आवाहनही खासदार वाकचौरे यांनी केले.
शिधा वाटप उपक्रमासाठी पदाधिकाऱ्यांचे योगदान
या शिधा वाटप उपक्रमाच्या नियोजनात संयोजक रोहित वाकचौरे, मुकुंद सिनगर, बाळासाहेब पवार, कमलाकर कोते, नितीन औताडे, राजेंद्र झावरे, धनंजय जाधव, भाऊसाहेब कांबळे, संपत काका जाधव, मारुती मेंगाळ, सुशांत गजे, नितीन जगताप, सचिन बडदे, अनिल बांगरे, सोमनाथ गोरे, मच्छिन्द्र भवर, सचिन मलिक, तान्हाजी लामखडे, ज्ञानेश्वर कपिले, रिंकेश जाधव, भाऊ वाकचौरे, ज्ञानेश्वर सानप, तनिष जैन, गणेश वाळुंज, सचिन वाबळे आदींनी विशेष मेहनत घेतली.
दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याबरोबरच त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी 'शेतकरी सेवा केंद्र' उभारण्याची घोषणा केल्याने या उपक्रमाकडे आता मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

