shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/

About Me

तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने इंदापूर पोलीस बांधवांची भाऊबीज उत्साहात साजरी; कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांप्रती बहिणींनी व्यक्त केले प्रेम!

तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने इंदापूर पोलीस बांधवांची भाऊबीज उत्साहात साजरी; कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांप्रती बहिणींनी व्यक्त केले प्रेम!
इंदापूर : प्रतिनिधी

दिवाळी हा आनंदाचा आणि कुटुंबीयांसोबत सण साजरा करण्याचा महत्त्वाचा सण. मात्र, सर्वसामान्य नागरिक आपल्या कुटुंबासोबत दिवाळीचा आनंद घेत असताना पोलीस बांधवांना मात्र कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सणासुदीच्या दिवसांतही रात्रंदिवस कर्तव्य बजावावे लागते. आपल्या कुटुंबापासून दूर राहून नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या या पोलीस बांधवांची भाऊबीज तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने इंदापूर पोलीस स्टेशन येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात साजरी करण्यात आली.
शासकीय व निमशासकीय कार्यालयांना दिवाळीच्या सुट्ट्या असतात. अनेकजण आपल्या गावी जाऊन कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करतात. मात्र, पोलीस बांधवांना सणासुदीच्या काळातही आपले कर्तव्य प्राधान्याने पार पाडावे लागते. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र दक्ष असणाऱ्या या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून तेजपृथ्वी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत अनोख्या पद्धतीने भाऊबीज साजरी केली.
यावेळी तेजपृथ्वी ग्रुपच्या अनिता खरात म्हणाल्या की, "दिवाळीच्या सणाला प्रत्येकजण आपल्या कुटुंबासोबत आनंद साजरा करत असतो. मात्र, माझे पोलीस बांधव स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून रात्रंदिवस आपले कर्तव्य बजावत असतात. ते आमच्या सर्व बहिणींचे रक्षण करतात. अशा कर्तव्यदक्ष भावांसोबत आज भाऊबीज साजरी करताना जो आनंद मिळाला, तो शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे."

यावेळी तेजपृथ्वी ग्रुपच्या शोभाताई माने आणि जयश्रीताई पाटील यांनीही पोलीस बांधवांना भाऊबीजेच्या शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

पोलीस बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा आणि कर्तव्य बजावणाऱ्या रक्षकांप्रती प्रेम, आपुलकी व कृतज्ञता व्यक्त करणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी भावनिक आणि संस्मरणीय ठरला. तेजपृथ्वी ग्रुपच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

close