shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/

About Me

जन्मतः दोन्ही पाय नसतानाही जिद्दीच्या बळावर आकाशाला गवसणी!.., ध्येयवेडा दिव्यांग आकाश अशोक पवार यांची ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचापर्यंत झेप!

शरीराला पाय नाहीत, पण स्वप्नांना पंख आहेत! हातांच्या बळावर गड-किल्ले सर करणारा, शिक्षणात गुणवत्ता सिद्ध करणारा, संघर्षातून संसार उभा करणारा आणि लाखो लोकांना जगण्याची नवी उमेद देणारा आकाश पवार आज वडार समाजासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणास्थान ठरत आहे.

शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा : विशेष प्रेरणादायी व्यक्तिचित्र

काही माणसांच्या आयुष्यात नियती जन्मापासूनच संघर्षाचे पर्व लिहून ठेवते; मात्र त्या संघर्षापुढे हार न मानता स्वतःच्या कर्तृत्वाने नवे इतिहास घडविणारी माणसे विरळाच असतात. जन्मतः दोन्ही पाय नसतानाही शिक्षण, कला, क्रीडा, गिर्यारोहण, सामाजिक कार्य, नोकरी, व्यवसाय आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या अशा प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करणारे आकाश अशोक पवार हे त्यापैकीच एक असामान्य व्यक्तिमत्त्व!

          आज आकाश पवार यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर थेट ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) या लोकप्रिय कार्यक्रमाच्या मंचापर्यंत मजल मारली आहे. त्यांच्या या प्रवासामुळे वडार समाजाची मान अभिमानाने उंचावली असून, असंख्य दिव्यांग व्यक्तींसाठी ते आशेचा किरण बनले आहेत.

*जन्मतः संकट, पण आई-वडिलांनी सोडली नाही उमेद!*
         आकाश पवार यांचा जन्म २५ ऑगस्ट १९९६ रोजी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील परंदवडी येथे त्यांच्या आजोळी झाला. जन्मतःच त्यांच्या दोन्ही पायांची पूर्ण वाढ झालेली नव्हती. कमरेखालील मांड्या, गुडघे आणि पोटऱ्या नसल्याने त्यांना गंभीर शारीरिक दिव्यांगत्वाचा सामना करावा लागला. सुरुवातीला त्यांचे दिव्यांगत्व १०० टक्के होते; सध्या ते ९० टक्के असल्याचे सांगण्यात येते.
        बाळाच्या जन्मानंतर आई-वडिलांसमोर भविष्याचा मोठा प्रश्न उभा राहिला. अनेक तज्ज्ञ डॉक्टरांकडे उपचारासाठी धावपळ केली. शस्त्रक्रियेद्वारे काही चमत्कार घडेल, या आशेने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. आर्थिक परिस्थितीही हलाखीची होती. काहींनी तर बाळाला अनाथाश्रमात देण्याचा सल्लाही दिला. परंतु आईच्या ममतेला ते कधीच मान्य नव्हते.
         त्याच काळात आकाशला न्यूमोनियाची लागण झाली. प्रकृती गंभीर झाल्याने डॉक्टरांनीही जगण्याची आशा अत्यंत कमी असल्याचे सांगितले. मात्र आई-वडिलांनी धीर सोडला नाही. आईने आपल्या बाळाची अहोरात्र काळजी घेतली. मृत्यूच्या छायेतून बाहेर पडलेल्या या बाळाचा जीवनप्रवास म्हणजे जणू पुनर्जन्मच!
       त्याच वेळी आई-वडिलांनी एक निर्धार केला—काहीही झाले तरी या मुलाला शिकवायचे, स्वावलंबी बनवायचे आणि त्याच्या पंखांना बळ द्यायचे!


*शिक्षणाच्या वाटेवर अनेक अडथळे, तरीही यशाची शिखरे!
आकाशचे बालपण पुण्यातील येरवडा परिसरात गेले. मोठ्या भावाला शाळेत जाताना पाहून आकाशलाही शाळेत जाण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. मात्र शारीरिक दिव्यांगत्वामुळे अनेक शाळांनी प्रवेश नाकारला. काही ठिकाणी शारीरिक तपासणीच्या कारणास्तव प्रवेश मिळू शकला नाही.
        अखेर मावळ तालुक्यातील कान्हे फाटा परिसरातील साईबाबा प्रतिष्ठानच्या एस.ई.सी. ब्रह्मा सेंटर या निवासी शाळेत त्याला प्रवेश मिळाला. येथे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत त्याने प्रत्येक वर्गात प्रथम क्रमांक मिळवला. चित्रकला, वक्तृत्व, नाट्य, गायन आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांतही त्याने अनेक पुरस्कार पटकावले.
           पुढे इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण निवासी सुविधेतून पूर्ण केले. दहावीच्या परीक्षेत तब्बल ७२ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक मिळवला.
         अकरावी-बारावीसाठीही प्रवेश मिळवताना अनेक अडचणी आल्या. अखेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, येरवडा, पुणे येथे वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. बारावीमध्ये ६८ टक्के गुण मिळवले.
           याच काळात संगणक शिक्षणाची आवड जोपासत त्याने विविध आयटी, वेब डिझाइन आणि संगणकविषयक डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण केले. इंग्रजी-मराठी टायपिंग, डीटीपी, टॅली आणि मोबाईल दुरुस्तीचे प्रशिक्षणही घेतले. विशेष म्हणजे, शिक्षणासोबत अर्धवेळ नोकरी करून त्याने आपला शैक्षणिक प्रवास सुरू ठेवला.
         पुढे शैक्षणिक कर्ज घेऊन पुण्यातील मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर येथे बीसीएची पदवी पूर्ण केली. प्रतिकूल परिस्थितीतही उच्च शिक्षण पूर्ण करण्याची त्याची जिद्द खरोखरच कौतुकास्पद आहे.
*पाय नसताना हातांच्या बळावर गड-किल्ले सर करणारा मावळा!*

*आकाशच्या आयुष्यातील सर्वांत थक्क करणारा अध्याय म्हणजे त्याचे गिर्यारोहण!

इयत्ता अकरावीत असताना आईने त्याला स्वतःच्या हातांच्या बळावर पुढे सरकण्याची पद्धत शिकवली. मेक माय ड्रीम संस्थेच्या मेघा कुलकर्णी ताई यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला नवी दिशा मिळाली.
         सिंहगड, राजमाची, पर्वती, कोरीगड, पुरंदर आणि शिवनेरी यांसारखे ऐतिहासिक गड-किल्ले त्याने चक्क दोन्ही हातांच्या बळावर सर केले. जिथे धडधाकट माणसांनाही चढाई करताना दमछाक होते, तिथे आकाशने आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर अशक्य वाटणारे आव्हान शक्य करून दाखवले.
         मेक माय ड्रीम संस्थेने त्याला तीनचाकी सायकल आणि कृत्रिम पाय उपलब्ध करून दिले. काही काळ त्याने त्यांचा वापर केला. पुढे स्वतःच्या स्वावलंबनासाठी दुचाकी चालविण्याचे कौशल्य आत्मसात केले. वैद्यकीय प्रमाणपत्र आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहन चालविण्याचा परवाना मिळवला. आज तो स्वतः वाहन चालवत प्रवास करतो.

*कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी!
आकाश केवळ अभ्यासातच हुशार नाही, तर कला आणि क्रीडा क्षेत्रातही त्याने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. संगीताच्या चार परीक्षा पूर्ण केल्या असून नाटक, गायन, नृत्य चित्रकला, रंगभूषा, अभिनय आणि वक्तृत्व या क्षेत्रांतही त्याने प्रावीण्य मिळवले आहे.
        राजस्थानमधील उदयपूर येथे सादर केलेल्या नाटकात त्याने मंगल पांडे यांची भूमिका साकारली. या भूमिकेसाठी त्याला विशेष गौरव प्राप्त झाला. विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत त्याने सुमारे ६० ते ७० पदके आणि असंख्य प्रमाणपत्रे मिळवली आहेत.
       कराटे, बुद्धिबळ, कॅरम अशा खेळांतही त्याने कौशल्य सिद्ध केले आहे. त्याच्या कार्याची दखल विविध वृत्तपत्रांनी घेतली असून सुमारे ४० ते ५० वृत्तपत्रीय बातम्यांमधून त्याचा प्रवास प्रसिद्ध झाला आहे. झी टीव्ही, सह्याद्री, दूरदर्शन, आकाशवाणी आणि साम टीव्ही यांसारख्या माध्यमांनीही त्याची दखल घेतली आहे.

*सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो लोकांना सकारात्मक ऊर्जा!*

आजच्या डिजिटल युगात आकाशने यूट्यूब आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातूनही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रेरणादायी विचार, मोटिव्हेशनल व्हिडिओ आणि रील्सच्या माध्यमातून तो लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो.
        निराश झालेल्या व्यक्तींना स्वतःच्या आयुष्याचे उदाहरण देत तो जगण्याची नवी उमेद देतो. अनेक नामांकित कलाकारांशी त्याच्या भेटी झाल्या आहेत. दोन लघुपटांमध्येही त्याने अभिनय केला आहे. विविध कार्यक्रमांमध्ये विशेष पाहुणा म्हणून त्याला निमंत्रित केले जाते.
         यूट्यूब सिल्व्हर बटण मिळवण्याचा मानही त्याने पटकावला आहे.

*पुरस्कारांनी गौरवलेले कर्तृत्व!
आकाशच्या जिद्दीची आणि कार्याची दखल घेत त्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने—

१. अपंग सेवा केंद्र, सांगली यांच्याकडून जिद्दी पुरस्कार
२. नाट्यगौरव पुरस्कार
३. ध्येयवेडा पुरस्कार
४. दिव्यरत्न पुरस्कार
५. प्रेरणारत्न पुरस्कार
६. यूट्यूब सिल्व्हर बटण
७. हरबा वडार विशेष पुरस्कार
यांसह अनेक सन्मान, ट्रॉफी, प्रमाणपत्रे आणि रोख पारितोषिके त्याला प्राप्त झाली आहेत.

*स्वतःच्या संघर्षातून इतरांना मदतीचा हात!*

आकाश केवळ स्वतःच्या यशापुरता मर्यादित राहिलेला नाही. अनेक गरजू आणि गरीब रुग्णांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी तो पुढाकार घेतो. गरजू रुग्णांच्या मदतीसाठी लोकांना आवाहन करून सहकार्य मिळवून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा असतो.
         विशेषतः हात-पायांच्या शस्त्रक्रियेनंतर निराश झालेल्या रुग्णांना भेटून तो स्वतःचे उदाहरण देतो. शरीराने सक्षम असूनही मनाने खचलेल्या व्यक्तींना सकारात्मक विचारांची ऊर्जा देतो. स्वतःच्या वेदना विसरून दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याची त्याची वृत्ती खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडवते.

*वडार समाजाचा अभिमान असलेले कुटुंब!*

आकाशचे वडील अशोक पवार हे यांत्रिकी अभियांत्रिकी पदविकाधारक असून वडार समाजाच्या सामाजिक कार्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. ते एक निष्ठावंत वडार समाजसेवक म्हणून परिचित आहेत.
          सन २०१७-१८ पासून त्यांनी समाजासाठी विनामूल्य वधू-वर सूचक सेवा सुरू ठेवली आहे. या माध्यमातून आजपर्यंत आठ हजारांहून अधिक विवाह जुळविण्यात यश आल्याचे सांगण्यात येते. वडार समाजाचे वधू-वर व पालक परिचय मेळावे, जागतिक महिला दिन, अखिल वडार बोली साहित्य संमेलन अशा विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग आहे.
          ते अखिल वडार बोली साहित्य मंडळ, पुणे या संस्थेचे सचिव म्हणूनही कार्यरत आहेत.

आकाशची आई बारावी विज्ञान शाखेपर्यंत शिक्षण घेतलेली गृहिणी आहे. मोठा भाऊ बी.ई. सिव्हिल इंजिनिअर असून बांधकाम व्यवसायात यशस्वी उद्योजक आहे. तर धाकटा भाऊ बीसीए पदवीधर असून टाटा कम्युनिकेशनमध्ये पुणे येथे कार्यरत आहे.
           एकमेकांना आधार देणारे आणि सामाजिक कार्याची परंपरा जपणारे हे कुटुंब निश्चितच आदर्शवत आहे.

*दोन्ही पाय नसतानाही संसाराचा गाडा समर्थपणे ओढणारा कर्ता पुरुष!*

आकाशच्या आयुष्यातील आणखी एक प्रेरणादायी पैलू म्हणजे त्याचा कौटुंबिक संसार!
         पंढरपूरजवळील तुगत येथील नेहा या स्वजातीय मुलीशी त्याचा विवाह झाला. विवाहाला सुमारे सहा वर्षे झाली असून दोघांचा संसार आनंदाने सुरू आहे. नेहाने विवाहानंतरही आपले शिक्षण पदवीपर्यंत पूर्ण केले. ती एक प्रेमळ पत्नी, सून आणि कुटुंबातील जबाबदार सदस्य म्हणून आपली भूमिका समर्थपणे पार पाडत आहे.
         दोघेही एकत्र फिरणे, ऐतिहासिक स्थळांना भेटी देणे, चित्रपट पाहणे, हेलिकॉप्टर आणि बलूनमधून प्रवास करणे अशा विविध आनंददायी अनुभवांचा आनंद घेतात. मुंबईतील समुद्रप्रवास, घोडेस्वारी आणि उंटसवारीसारखे अनुभवही त्यांनी घेतले आहेत.
        आकाशने आयुष्यातील चढ-उतारांचा सामना करत नोकरीच्या विविध संधी स्वीकारल्या. ॲमेझॉन या आंतरराष्ट्रीय कंपनीत विमाननगर, पुणे येथेही त्याने काम केले. नोकरीत बदल आणि आर्थिक अडचणींचा सामना करताना त्याने झोमॅटोमध्ये दिवसरात्र मेहनत करून कुटुंबाचा खर्च आणि कर्जाचे हप्ते सांभाळले. पत्नीच्या प्रसूतीचा खर्च आणि घरातील जबाबदाऱ्या यांचीही काळजी घेतली.
       सध्या तो एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. त्यांना आठ महिन्यांचे गोंडस जुळी मुलगा - मुलगी असून त्यांच्या संसारात आनंदाचे नवे पर्व सुरू झाले आहे.
       स्वतःच्या पायावर उभे राहणे म्हणजे केवळ चालणे नव्हे, तर स्वतःच्या कर्तृत्वाने संपूर्ण कुटुंबाला आधार देणे, याचा प्रत्यय आकाशच्या जीवनातून येतो.

*‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचापर्यंत धडक!*

आकाशच्या आयुष्यात आता एक नवा आणि महत्त्वाचा टप्पा आला आहे. लोकप्रिय दूरचित्रवाणी कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) या कार्यक्रमासाठी त्याला संपर्क करण्यात आला. त्यानंतर ऑडिशन आणि पुढील प्रक्रियेचा प्रवास सुरू झाला.
        तीन ते चार दिवस ऑडिशनसंबंधित चित्रीकरणाची प्रक्रिया त्याने स्वतःच्या घरी पूर्ण केली. त्यानंतर ९ तारखेला मुंबईत दाखल होऊन हॉटेलमध्ये मुक्काम केला. कार्यक्रमाच्या आयोजकांकडून आवश्यक सूचना देण्यात आल्या आणि पुढील प्रक्रियेसाठी तयारी सुरू झाली.
         १० तारखेला त्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस उजाडला. कार्यक्रमाच्या नव्या स्वरूपानुसार स्पर्धकांची निवड, गट आणि बझर प्रक्रियेचा अनुभव त्याला मिळाला. आकाशला पहिला क्रमांक देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
        आता पुढे नेमके काय घडणार? आकाशला प्रत्यक्ष हॉट सीटवर बसण्याची संधी मिळणार का? त्याच्या ज्ञानाची आणि बुद्धिमत्तेची कसोटी कशी लागणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देईल. मात्र या टप्प्यापर्यंत पोहोचणे हीच त्याच्या जिद्दीची मोठी पावती आहे.

*अखेर हॉट सिट वर बसण्याची संधी मिळाली*

अखेर १० नोव्हेंबर  रोजी बझर ने अचूक उत्तराने सुरुवात केली समोर महानायक समोर हॉट सीट वर संधी मिळाली हेच आनंदाचा क्षण होता तितकाच दबाव होत होता एका मागोमाग अचूक उतर देत होता प्रक्षेक स्वतः महानायक अमिताभ बच्चन प्रोत्साहन देत होते अधून मधून विनोदी करून एक एक टप्पा पूर्ण करीत पहिल्या एपिसोड पूर्ण करीत २ लाख रक्कमेचा अजिंक्य राहिला होता खरी कसोटी सुरुवात झाली २ लाखाचे ५ लाख रुपये झाले त्या रक्कमेला लॉक करून पुढील ७.५० लाख रक्कमेची जिंकले १२.५० लाख रुपये जिंकण्यात अपयश आले त्यामुळे ७.५ लाख वजावट होवुन ५ लाख रुपये निश्चित करण्यात आले 
दिनांक ११ नोव्हेंबर के बी सी एपिसोड पूर्ण झाले आणि ५४००००/- रक्कमेपर्यंत पोचवू शकला विशेषत महानायक अमिताभ बच्चन यांनी महागडी जॅकेट गिफ्ट दिली सोबत २ ग्रॅम सोन्याचे शिक्का सियारामचे कपडे, मिल्किमिस्ट या ब्रँड चे गिफ्ट हॅम्पर गोवर्धन घी व्हाउचर, १लाख चे मेक माय ड्रिम ट्रॅव्हल आणि बरेच काही 
कालचा खूप छान अनुभव होता लवकरच शो एपिसोड अप वर येईल 

*शरीराला मर्यादा असतात; स्वप्नांना नसतात!*

आकाश पवार यांची जीवनकहाणी ही केवळ एका दिव्यांग तरुणाच्या संघर्षाची कहाणी नाही, तर इच्छाशक्ती, आत्मविश्वास, शिक्षण, स्वावलंबन आणि सकारात्मक विचारांची जिवंत प्रेरणागाथा आहे.
            जन्मतः दोन्ही पाय नसतानाही त्याने शिक्षण पूर्ण केले, गड-किल्ले सर केले, कला-क्रीडा क्षेत्रात यश मिळवले, वाहन चालविण्याचे कौशल्य आत्मसात केले, नोकरी केली, संसार उभा केला आणि इतरांच्या मदतीसाठीही पुढाकार घेतला.

आज अनेकजण छोट्याशा अपयशाने खचून जातात; परंतु आकाशने आयुष्यभर समोर आलेल्या संकटांना संधीमध्ये बदलले. त्याच्या नावातच आकाश आहे आणि त्याच्या कर्तृत्वाने त्याने खऱ्या अर्थाने आकाशाला गवसणी घातली आहे!
            वडार समाजातील अशा ध्येयवेड्या तरुणाच्या कर्तृत्वाचा समाजाने अभिमान बाळगला पाहिजे. आकाशच्या यशातून प्रत्येक तरुणाने एकच धडा घ्यावा—परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास असेल तर यशाचे शिखर गाठता येते!
         आकाश पवार यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांच्या जिद्दीला, कर्तृत्वाला आणि संघर्षाला मानाचा मुजरा!

शब्दांकन :
श्री. रमेश सखाराम जेठे
ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक
‘शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा’
देहरे, अहिल्यानगर, महाराष्ट्र.
सहसचिव – अखिल वडार बोली साहित्य मंडळ, पुणे.
close