केज  / तालुका प्रतिनिधी ( प्रकाश मुंडे)  :- 
कोवीड १९ मुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये ४८ ते ७२ तासाच्या आत मृत होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे ७० टक्के असुन हे प्रमाण कमी करण्यासाठी कोवीड ची लक्षणे दिसु लागताच रुग्णांनी उपचारासाठी यावे असे आवाहन स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोवीड केअर हाँस्पिटलचे प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांनी व्यक्त केले.
    

अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोवीड केअर हाँस्पिटलमध्ये ४ जून २०२० रोजी कोवीडचा पहिला रुग्ण आला. या रुग्णापाठोपाठ ट्रेसिंग दरम्यान त्याच्या कुटुंबातील इतर चार सदस्य पाँझिटीव्ह निघाले आणि ही साखळी सतत वाढत गेली. हा पहिला रुग्ण आणि त्याचे नातेवाईक बरे होवून घरी गेले असले याचे समाधान असले तरी नंतर वाढत जाणारा मृत्युदर हा काळजी वाढवणारा आहे. 
मुळात कोवीड १९ या आजाराबध्दल बध्दल लोक अजूनही गांभीर्याने घेत नाहीत, ही खंत आहे. कोवीड ची लक्षणे दिसू लागताच उपचारासाठी आलेले शेकडो रुग्ण बरे होवून घरी गेलेले आहेत. 
      
कोवीड १९ मुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये पहिल्या ४८ ते ७२ तासात होणार्‍या म्रत्यु चे दर ७० टक्के च्या आसपास आहे. असे निरीक्षण स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे मेडिसीन विभाग प्रमुख तथा कोवीड केअर हाँस्पिटलचे प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांनी नोंदवले आहे. 

या संदर्भात बोलताना डॉ. बिराजदार पुढे म्हणाले की, कोवीडच्या भितीमुळे मानसिक ताणतणाव निर्माण होतो, यामुळे मनात एक भीती निर्माण होऊन रूग्ण स्वतः आजार कोणालाही न सांगता अंगावर काढतो. जेव्हा आजार वाढतो, तेव्हा आपल्या फुप्फुसाचा ५० ते ७० टक्के भाग हा संक्रमित झालेला असतो. तेंव्हा आँक्सीजनचा पुरवठा करणे सुद्धा अवघड होते. ह्या आजाराचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे "हँपी हायपोक़झिया".  ह्या प्रकारात शरिरातील आँक्सीजनची पातळी कमी होउन सुद्धा ज्या प्रमाणात दम, लागायला पाहिजे तो लागत नसल्याने रुग्णांना आपल्या आजाराचा गंभीर पणा लक्षात येत नाही. म्हणून रुग्ण उपचारासाठी उशिरा येतो व त्याचा परिणाम त्याच्यावर उपचार करणं खुपचं अवघड होतं. हे सर्व टाळण्यासाठी सर्वच कुटुंबातील वयस्कर व्यक्तींची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक घरी पल्स आँक्सीमिटर  हे छोटेसे यंत्र असणे गरजेचे असून त्यादृष्टीने सर्दी, खोकला, ताप आलेल्या रुग्णांचे आँक्सीजनची पातळी तपासून, वेळीच उपचार सुरू केले तर चांगले परिणाम दिसून येतील. ह्या आजारात मानसिक संतुलन राखू्न ठेवणे हे ही खुपच गरजेचे आहे.
     
हा आजार असतांनाही अनामिक भितीने अनेक लोक रुग्णालयात येण्यास खुप उशीर करतात. किंबहुना अत्यंत अस्वस्थ झाल्यानंतरच हे रुग्ण उपचारासाठी येतात. यामध्ये ७० वर्षापुढील उच्चरक्तदाब, मधुमेह, न्युमोनिया, श्वसनाचे आजार व इतर आजार असणा-यांची संख्या खुप मोठी आहे. या रुग्णांच्या इतर सर्व टेस्ट करुन त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वेळ जातो आणि परिणामी असे रुग्ण बारा ते चोवीस तासाच्या आतच दगावतात.  
      
कोवीड १९ ची लक्षणे जाणवू लागताच उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचा मृत्युदर त्या मानाने खुप कमी आहे. असे रुग्ण औषधोपचारासोबत मानसिक समुपदेशानेही लवकर बरे होतात असा अनुभव आहे. मुळात कोवीड रुग्णांना घरातील लोकांनी व समाजातील लोकांनी त्याचे मानसिक बळवाढवण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत. ते फार कमी प्रमाणात होते असे दिसते. कोवीड विरुध्दचा लढा हा केवळ रुग्ण आणि डॉक्टर यांचाच नाही तर समाजातील सर्व घटकांचा आहे. यालढ्यात समाजातील सर्व शासनानी दिलेले सर्व निर्बंध पाळत या लढ्यात सहभागी व्हायला हवे. असे आवाहनही डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांनी केले आहे.