शनिवारी रात्री अबुधाबी येथील शेख जायेद स्टेडीयमवर आपल्या पहिल्या सामन्यातील दोन पराभूत संंघ कोलकाता नाईट रायडर्स व सन रायझर्स हैद्राबाद या संघात एक सामना झाला. रिकाम्या स्टेडीयम मध्ये सामने होत आहेत म्हणून बरे झाले. नाही तर त्या सामन्याचे प्रेक्षक प्रचंड बोअर झाले असते. कारण हा सामना अतिशय एकतर्फी व निरस झाला. कोलकाता संघ व त्यांचे समर्थक सोडून दुसऱ्या कोणाला आनंद मिळाला असेल असे या सामन्यात मनोरंजक असे काही झालेच नाही.
                 

प्रस्तुत सामन्यात सन रायझर्सने नाणेफेक जिंकून धाडसी निर्णय घेऊन प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय मात्र तो त्यांच्या चांगलाच अंगलट आला. जेमतेम १४३ धावा फलकावर लावण्यात यश मिळालेल्या हैद्राबादच्या गोलंदाजांनीही निराशाजनक कामगिरी करून आपल्याच जखमांवर मिठ चोळून घेतले. वरून दिसायला भरभक्कम दिसणाऱ्या हैद्राबादचे या पराभवाने पितळ उघडे पडले आहे.
               
या गडबडीत मात्र केकेआरने आपल्या पहिल्या विजयाची नोंद करून आपले विजयाचे खाते उघडले. सदर लेखात आपण केकेआरच्या विजयात महत्वपूर्ण खेळ करणाऱ्या काही निवडक खेळाडूंची कामगिरी जाणून घेऊया.
                 
जगातील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने केकेआरकडून आपला दुसरा सामना खेळताना अतिशय तिखट मारा करताना हैद्राबादी फलंदाजांना पूर्णपणे वेसण घातली व धावांची मोठी बचत करताना जॉनी बॅरिअस्टोचा बळी घेताना ४ षटकात ४.७५ च्या इकॉनॉमी रेटने अवघ्या १९ धावा दिल्या. मुंबई इंडियन्स विरूद्धच्या पहिल्या सामन्यात धावांची खैरात वाटल्या नंतर या त्याच्या कामगिरीत लक्षणीय बदल झाला.
                       
अदभूत फिरकी गोलंदाज वरूण चक्रवर्तीने या सत्रातला केकेआर फडून पहिलाच सामना खेळताना अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन करताना आपल्या चार षटकांच्या हप्त्यात २५ धावा देत डेव्हीड वॉर्नरचा महत्वाचा बळी घेऊन हैद्राबादच्या शिडातली हवाच काढून घेतली.
                      
एकतर्फी ठरलेल्या सामन्यात केकेआरचा वीस वर्षीय सलामीवीर शुुभमन गिल या सामन्यात क्रिकेट रसिकांचे दिल जिंकण्यात यशस्वी झाला. त्याचा सलामीचा साथीदार सुनिल नारायण अपयशी ठरल्यानंतर जबाबदारीने खेळताना गिलने नाबाद राहात ७० धावांचे योगदान संघाच्या झोळीत टाकून संघाला विजयी करूनच परतला. गिलने ६२ चेंडूच्या खेळीत पाच चौकार व २ षटकार मारले व इंग्लिश खेळाडू ओएन मॉर्गनसह ९२ धावांची भागीदारी करून संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला.
                   
इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार ओएन मॉर्गन या वेळेस केकेआरच्या कळपात समाविष्ठ असून या विजयात त्याने आपला वाटा उचलताना आपल्या लौकीकाप्रमाणे ताबडतोब फलंदाजी करताना मात्र २९ चेंडूत नाबाद ४२ धावांची जोरदार खेळी केली. यामध्ये त्याने तीन चौकार व दोन षटकार ठोकले.
                  
केकेआरचा डावखुरा फलंदाज नितीश राणाने अवघ्या २६ धावांची छोटेखानी खेळी केली खरी. पण ती करताना त्याने अवघ्या १३ चेंडूत २०० च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली. या खेळीत त्याचे सहा चौकार होते हे विशेष. त्यामुळे केकेआरची धावगती वधारली.

लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com