सोनमांजरीची गंभीर पाणी समस्या लवकरच सोडवणार: सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे
लोहा( प्रतिनिधी)
लोहा तालुक्यातील सोन मांजरी ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्याने सोनमांजरी ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच, सदस्य यांच्यावतीने सोमवार दि. 22 रोजी सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला ,यावेळी जिल्हा परिषद सदस्य हंसराज पाटील बोरगावकर, खरेदी-विक्री संघाचे उपसभापती शाम अण्णा पवार, बोरगावचे सरपंच पुंडलिक पाटील, नवनिर्वाचित सरपंच नीलू बाई लोंढे, उपसरपंच गणेश पवार सह गावकरी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सौ .आशाताई शिंदे म्हणाल्या की सोन मांजरी ग्रामस्थांची पाणी समस्या गेल्या अनेक वर्षापासून बिकट असून सोनमांजरी ग्रामस्थांना मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी सुनेगाव साठवण तलावातून पाणीपुरवठा करण्यासाठी मंत्रालय स्तरावर निधीची मागणी केली असून काही दिवसातच या कामाला मंजुरी मिळणार असल्याचे यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी बोलताना सांगितले, आगामी काळात सोन मांजरी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासणार नसल्याचेही सौ. शिंदे यांनी स्पष्ट केले, सोन मांजरी च्या नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच, सदस्य व सर्व गावकऱ्यांनी स्वच्छ व सुंदर गावाची संकल्पना येणाऱ्या काळात गावात राबवावी असे आवाहन यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी सोन मांजरी ग्रामस्थांना केले,
यावेळी या कार्यक्रमास अशोक पाटील कळकेकर, माधव घोरबांड, संचालक सुधाकर सातपुते, सिद्धेश्वर वडजे, नागेश खांबे गावकर, राहुल पाटील, अशोक सोनकांबळे, सचिन कल्याणकर सह सोनमांजरी येथील सर्व नवनिर्वाचित सदस्य, महिला, गावकरी सामाजिक अंतराचे पालन करत मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

