लोकांमध्ये माणुसकीची श्रीमंती वाढविण्यासाठी संत गाडगेबाबा चंदनासारखे झिजले.. माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे..!!
भिमाई आश्रमशाळेत संत गाडगेबाबांची जयंती झाली साजरी.
संत गाडगेबाबा सामाजिक स्वच्छतेचे एक चालते बोलते विद्यापीठ होते - रत्नाकर मखरे
यांचे प्रतिपादन
इंदापूर प्रतिनिधी - (दि. २३/२/२०२१) :- येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे अध्यक्ष व इंदापूरचे माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांच्या हस्ते स्वच्छ्ता सूर्य संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला मंगळवारी (दि.२३) रोजी भिमाई आश्रमशाळेत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते.
मखरे म्हणाले की, समाजात जेव्हा अज्ञान,अनारोग्य व अंधश्रद्धांचा अंधार पसरलेला होता. तेव्हा संत गाडगे बाबांनी आपल्या हातात खराटा घेऊन लोकांच्यामध्ये स्वच्छतेचा दीपस्तंभ उभारला. लोकांच्या पायाखाली स्वच्छतेची फुले वाहणारा पहिला आधार म्हणजेच गाडगेबाबा होय. लोकांची मने उजळण्यासाठी बाबांनी सार्वजनिक स्वच्छतेला आरंभ केला. लोकांमध्ये माणुसकीची श्रीमंती वाढविण्यासाठी बाबा चंदनासारखे झिजले. कोणत्याही अपेक्षे शिवाय बाबांनी वाड्या,वस्त्या ,गावे स्वच्छ करून समाजाला स्वच्छतेचा मूलमंत्र दिला असे मखरे आपल्या भाषणात म्हणाले. यावेळी कार्यक्रमास सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
शाळेत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन हिरालाल चंदनशिवे यांनी केले. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कार्यक्रमस्थळी काळजी घेतली गेली.

