पर्यावरण जनजागरणाच्यादृष्टीने नक्षत्रवनाचा विचार केल्यास मीन राशीच्या रेवती नक्षत्राचा पर्यायी वृक्ष चिंच आहे. वैदिक काळापासून या वृक्षाची महती आहे. याला संस्कृत मध्ये "चींचिणिका" असे म्हणतात.
विस्तीर्ण पसरणारा व सावली देणारा हा वृक्ष सुमारे ७५ ते ८० फुटापर्यंत वाढतो. सुमारे ३०० ते ५००० मिलिमीटर पर्जन्यमानाच्या क्षेत्रात ४७ डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंतच्या प्रदेशात, सर्व प्रकारच्या जमिनीत हा वृक्ष वाढतो. याला सोटमूळ असते त्यामुळे तो सहसा उन्मळून पडत नाही.
चिंचेची पाने बारीक असतात व मार्च-एप्रिलमध्ये नवीन पालवी येते.चिंचेची फळे हिवाळ्यात येतात व फेब्रुवारी एप्रिलपर्यंत तयार होतात. ३ ते १० सेंटीमीटर लांबीचे व १ ते २ सेंटीमीटर रुंदीचे आकडे असतात व यामध्ये तीन ते बारा बीया असतात. याला चिंचोके असे म्हणतात.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या झाडाचे पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेऊन रस्त्याच्या दुतर्फा चिंचा लावण्यास प्राधान्य दिले होते. चिंचेची पाने रक्तदोषनाशक व सूज उतरवण्यास उपयुक्त असतात. नवी चिंच कफ व वातकारक असते. विंचु चावल्यास चिंचोका भाजून अथवा पांढरा होईपर्यंत उगाळून दंशावर चिकटवतात. तो वेदना ओढून घेतो व आपोआप खाली पडतो. कोवळ्या चिंचा रुचकर अग्निप्रदीपक, वातनाशक असतात. चिंचेमध्ये टार्टारीक, सायट्रिक ऍसिड, ऍसिडीक, पोटॅशियम अशी आम्ले असतात.
चिंच पित्तनाशक आहे. तूरडाळ ही पित्तकारक आहे. सबब आहार संतुलनासाठी तुरीच्या वरणात चिंच घालण्याची रीत आहे.
चिंचेचा उपयोग सरबत, चटण्या, रस, भाजीत करतात.
चिंचोक्यात ६५ ते ७२ टक्के कार्बोहायड्रेट्स, प्रथिने १७ ते २०टक्के असतात. चिंचोक्याचे पीठ बलवृद्धीसाठी वापरतात. वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे.
लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती उपक्रमांतर्गत पर्यावरण विचार ग्रंथात प्रकाशित लेख..
*पर्यावरण दिन ५ जून २०२१ पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान.

