शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
आदिवासी, महावितरण, महसूल विभाग व नगरपरिषदेची आढावा बैठकीत सूचना
मंगळवार दिनांक १९ ऑक्टोंबर २०२१.
अहमदनगर : आदिवासी समाजासाठी असलेल्या शबरी घरकुल योजनेत राज्यात आदर्शवत ठरेल अशी वसाहत पारनेर तालुक्यात उभी करावी. अशा सूचना राज्याचे नगरविकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त प्रसाद तनपुरे यांनी आज येथे दिल्या. पारनेर तहसील कार्यालयात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली आज आदिवासी विकास विभाग, महावितरण व महसूल विभागाची आढावा बैठक झाली. त्यावेळी श्री.तनपुरे बोलत होते. याप्रसंगी पारनेरचे आमदार निलेश लंके, राजूर आदिवासी प्रकल्प अधिकारी राजेंद्र भवारी, महसूल उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार गणेश आढारी, मुख्याधिकारी श्रीमती सुनिता कुमावत तसेच पोलीस व जिल्हा परिषदचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
श्री.तनपुरे पुढे म्हणाले, शबरी घरकुल योजनेत राज्यात आदर्शवत ठरेल अशी वसाहत उभी झाली पाहिजे यासाठी सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत. या योजनेत जागा व जातीच्या दाखल्याअभावी घरकुल दिले जात नसल्याचे बऱ्याच ठिकाणी निदर्शनास आले आहे. विशेषतः पारधी समाजातील लोकांना जातीचे दाखले देण्यासाठी मोहीम राबवावी. आदिवासी लोकांना रेशनकार्ड, जातीचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र आदी दाखले काढण्यासाठी येणारा खर्च आदिवासी विकास विभाग करणार आहे. ३१ आक्टोंबर पर्यंत ही मोहीम राबविली जाणार आहे. खावटी कर्ज योजना पूर्वी कर्ज स्वरूपात दिली जात होती या सरकारच्या काळात ती अनुदान स्वरूपात देण्यास सुरुवात झाली. कोवीड कालावधीत पारनेर तालुक्यात खावटी अनुदान योजनेत १३१० कुटुंबांना लाभ देण्यात आला. अशी माहिती ही श्री. तनपुरे यांनी यावेळी दिली.
महावितरण च्या कामकाजाचा आढावा घेतांना श्री.तनपुरे म्हणाले, शेतकऱ्यांना वीजेचे नवीन कनेक्शन देण्यास सुरुवात केलेली आहे. थकीत व चालू वीज बील भरल्यानंतर जमा झालेल्या पैशातील ३३ टक्के तूमच्या गावातच व ३३ टक्के जिल्ह्यातील वीज कामांसाठी खर्च करण्याचं शासनानं नवीन धोरण आणलं आहे. त्यांमुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वीज बिल नियमितपणे भरणा करावा. पारनेर तालुक्यात पुनेवाडी व अळकुट्टी ह्या सबस्टेशनचे काम लवकरात लवकर चालू करण्यात येईल. पारनेर नगरपरिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांची पदे भरण्याबाबत नगरविकास विभागाची मंत्रालयात लवकर बैठक घेण्यात येईल. असे ही तनपुरे यांनी सांगितले.
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सूचनेनुसार पारनेर मध्ये सर्वाधिक विकास योजनांचा लाभ मिळाला आहे. असे यावेळी आमदार निलेश लंके यांनी सांगितले.
बु-हाणनगर व तिसगाव पाणीपुरवठा योजनेबाबत बैठक
अहमदनगर येथे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली आज,दि.14 रोजी बु-हाणनगर व तिसगाव पाणीपुरवठा योजनेबाबत आढावा बैठक झाली. याबैठकीस अहमदनगर, राहुरी व पाथर्डी चे गटविकास अधिकारी, महावितरणचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठाचे उपअभियंता, सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते. या गावांमध्ये पाण्याचे मीटर तात्काळ बसविण्यात यावेत. कामात हलगर्जीपणा करण्यात येऊ नये. जिल्हयातील सहा गावांमध्ये ही योजना बंद असून ती पुन्हा चालू करण्यात यावी. या योजनेत सुसुत्रता कशी आणता येईल यासाठी प्रयत्न करावेत. जिल्हा परिषदेने या पाणीपुरवठा योजनेत लक्ष घालून ही योजना कशी कार्यरत राहील. याबाबत श्री.तनपुरे यांनी सूचना दिल्या.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

