पूर्णा । प्रतिनिधी :
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग दि. २४ जानेवारीपासून सुरु करण्यास जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी परवानगी बहाल केली आहे.
जिल्ह्यातील सर्व प्राचार्य व मुख्याध्यापकांना जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने शुक्रवारी (दि.२१) एक पत्र पाठवून दि.२४ जानेवारीपासून शासन परिपत्रकानुसार इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरळीत सुरु करावेत, असे स्पष्ट केले आहे.
जिल्हाधिका-र्यांच्या आदेशाप्रमाणे कोविड बाबत व लसीकरणाबाबत मार्गदर्शक सूचनांचे संबंधित शैक्षणिक संस्था, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी पालन करावे, असेही नमूद केले आहे. विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, या दृष्टीकोणातून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी शाळेत नियमित उपस्थित राहून कामकाज करावे,असेही शिक्षणाधिका-र्यांनी म्हटले आहे.
कोविड संदर्भात लक्षणे किंवा ताप, खोकला असणा-या विद्यार्थ्यांना पालकांनीच शाळेत पाठवू नये, असेही शिक्षणाधिका-यांनीनी म्हटले.

