------------//////




गड आला पण सिंह गेला जनविकासचे प्रमुख हारून इनामदार पराभूत तर त्यांची सौभाग्यवती विजयी


राकाँचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे याची कन्या डॉ हर्षदा सोनवणे पराभूत !


जनविकास परिवर्तन आघाडी- ८, राष्ट्रवादी - ५, काँग्रेस - ३, राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला -१ जागेवर विजयी


भाजपने एकही जागा लढविली नव्हती तर तेरा जागा लढविणाऱ्या शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही


बहुमतासाठी राजू शेट्टींची शिट्टी रांजणकर वाजविणार!

------------------------------------------------- 

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
 केज नगर पंचायतीच्या सतरा जागेसाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुक निकालात जनविकास परिवर्तन आघाडीला बहुमताच्या जवळ पोहोचली असून, जननिकास परिवर्तन आघाडीला ८ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला ५, नगर पंचायतीत दोन टर्म सत्तेवर असलेल्या सत्ताधारी काँग्रेसला ३ जागेवरच समाधान मानावे लागले आहे. तर राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाने एकाच जागेवर निवडणूक लढवीत एका जागेवर विजय प्राप्त केला आहे. विषेश म्हणजे जिल्ह्यात खासदार व केज विधानसभेत आमदार हा भाजपचा असताना त्यांनी तर निवडणुकच लढविली नव्हती. तर तेरा जागेवर निवडणूक लढविणाऱ्या शिवसेनेला भोपळाही फोडता आली नाही. त्यामुळे आता केज नगर पंचायतीच्या सत्तेत बहुमतासाठी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाच्या रांजणकर याना भाव येणार आहे.

कॉग्रेसच्या नेत्या खा. रजनीताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बनजरंग सोनवणे, शिवसेनेचे नेते माजी मंत्री जयदत्त क्षिरसागर यांचे स्विय सचिव गिरीष देशपांडे आणि जनविकास आघाडीचे हारून इनामदार व अंकुश इंगळे यांनी केज नगर पंचायतीची निवडणूक ही अटीतटीची केली होती. सुरवातीला ही निवडणूक चौरंगी होईल असा वाटत असताना मात्र जनविकास परिवर्तन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत झाली. 

प्रभाग क्र. एक मधून राष्ट्रवादीचे शेख अझरोद्दीन बशिरोद्दीन यांनी (५३१) मते मिळवून त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे लक्ष्मण जाधव (३५५)यांच्यावर १७६ मतांनी विजय मिळविला. प्रभाग क्र. दोन मध्ये जनविकास परिवर्तन आघाडीच्या आशाबाई सुग्रीव कराड (६०५) यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची कन्या डॉ. हर्षदा सोनवणे (५८८) यांच्यावर १७ मतांची आघाडी घेत विजय मिळविला. प्रभाग क्र. तीनमध्ये काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार रजनीताई पाटील यांचे चिरंजीव माजी नगराध्यक्ष आदित्य पाटील (५४३) यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे प्रदीप साखरे(२२१) यांच्यावर ३२२ मतांनी विजय प्राप्त केला. प्रभाग क्र. चारमध्ये  जनविकास परिवर्तन आघाडीच्या शकुंतला सज्जन अंधारे(४४४) यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीच्या बेबी इनामदार  (२१०) यांच्या पेक्षा २३४ मते अधिक मिळवून विजयी झाल्या. प्रभाग क्र. पाच मध्ये राष्ट्रवादीच्या सोजरबाई शिवाजी गाढवे (२९४) यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी विद्या पाटील यांच्या पेक्षा अवघ्या २ मतांची आघाडी घेत निसटता विजय प्राप्त केला.  प्रभाग क्र. सहा मध्ये जनविकास परिवर्तन आघाडीचे सर्वेसर्वा हारून इनामदार (३९२) यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बालासाहेब जाधव (४४४) यांनी ५२ मतांनी प्रभाव केला. प्रभाग क्र. सात मध्ये जनविकास परिवर्तन आघाडीच्या सिताताई बनसोड (५६०) यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे माजी नगरसेवक कपिल मस्के यांच्या पत्नी मीना मस्के (४४४) यांचा ११६ मतांनी पराभव करीत विजय प्राप्त केला. प्रभाग क्र. आठ मध्ये जनविकास परिवर्तन आघाडीचे हारून इनामदार यांच्या पत्नी आलीयाबेगम इनामदार (५१९) यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या सय्यद मसुदाबेगम (३३७) यांच्या पेक्षा १८२ मतांनी विजयी झाल्या. प्रभाग क्र. नऊ मध्ये जनविकास परिवर्तन आघाडीच्या पद्मिन शिंदे (३५४) यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवार सारिका सिरसट (२५२) यांच्यावर १०२ मतांची आघाडी घेत विजय प्राप्त केला. प्रभाग क्र. दहा मध्ये जनविकास परिवर्तन आघाडीच्या इनामदार रेश्मा जलालोद्दीन (४४५) यांनी राष्ट्रवादीच्या इनामदार शमशामोद्दीन (२७६) यांच्यावर २६९ मतांनी विजय मिळविला. प्रभाग क्र. अकरा मध्ये जनविकास परिवर्तन आघाडीच्या तरमीमबेगम इनामदार (५२३) यांनी काँग्रेसच्या दुर्गाताई भन्साळी (३६६) यांच्या पेक्षा १५७ मते अधिक मिळवून विजयी झाल्या. प्रभाग क्र बारा मध्ये काँग्रेसचे सोमनाथ गुंड (५२१) हे त्यांचे प्रतिस्पर्धी जनविकास परिवर्तन आघाडीचे मारुती वाकळे (२४२) यांच्या पेक्षा २७९ मते घेऊन विजयी झाले. प्रभाग क्र. तेरा मध्ये काँग्रेच्या माजी नगराध्यक्षा शितलताई दांगट (४७५) या त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीच्या पुष्पा लोंढे (३४५) यांच्यावर १३० मतांची आघाडी घेऊन विजयी झाल्या. प्रभाग क्र.चौदा मध्ये राष्ट्रवादीच्या शेख तस्लिमा (३९६) यांनी जनविकास परिवर्तन आघाडीच्या सय्यद फरीना (३१२) यांच्यावर ८४ मतांनी विजय मिळविला. प्रभाग क्र. पंधरा मध्ये राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक रामचंद्र गुंड (७६७) यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी जनविकास परिवर्तन आघाडीचे अतुल इंगळे (३६५) यांचा ४०२ मतांनी दणदणीत पराभव केला. प्रभाग क्र. सोळा मध्ये राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाच्या पल्लवी रांजणकर (३५६) यांनी जनविकास परिवर्तन आघाडीच्या विनिता हजारे (१९५) यांच्या पेक्षा १६१ मतांची आघाडी घेत विजयी झाल्या. तर प्रभाग क्र. सतरा मध्ये जनविकास परिवर्तन आघाडीचे जकीयोद्दीन इनामदार (४५४) यांनी त्याचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे सद्दाम खतीब (४३३) यांचा २१ मतांनी पराभव करून विजयो झाले.

दरम्यान केज नगर पंचायतीच्या सतरा जागेसाठी झालेल्या निवडणूक निकालात हारून इनामदार आणि अंकुशराव इंगळे यांची जनविकास परिवर्तन आघाडीने सर्वात जास्त म्हणजे आठ जागा जिंकल्या आहेत. तर त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसने पाच जागा जिंकल्या असून मागच्या वेळी सत्तेत असलेल्या काँग्रेसला मात्र अवघ्य तीन जागा जिंकता आल्या. तसेच विशेष बाब ही की, राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाने एक जागा जिंकली असून सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी त्या एका जागेला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे.