शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरुवार दिनांक २३ जून २०२२

ब्रेकिंग : आमदार संग्राम जगतापांनी दिली महत्त्वाची अपडेट..!!

अस्थिर राजकीय प्रसंगात राष्ट्रवादी काॅंग्रेस उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे ठामपणे उभी : शरद पवार
अहमदनगर : “उद्धव ठाकरे आजही मुख्यमंत्री आहेत. शिवसेना पक्षातंर्गत जे राजकीय वातावरण सुरू आहे, त्यावर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते लक्ष ठेवून आहेत. काही प्लॅन देखील तयार आहेत. एकनाथ शिंदे यांच्यानिमित्ताने राज्यात तयार झालेल्या राजकीय चक्रव्यूहामध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे. राज्यात सत्तांतर हाेईल का? यावर हे राजकीय चक्रव्युह आहे. यात सध्या चर्चा आणि प्रस्ताव देण्यात येत आहेत. प्रत्यक्ष काय घडेल, तेव्हाच कळेल. चक्रव्युह काेण भेदेल हे आता तरी सांगता येणार नाही, अशी प्रतिक्रिया अहमदनगर शहराचे राष्ट्रवादीचे काॅंग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी दिली.
       शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाखाेरीचा आज तिसरा दिवस आहे. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले आहे. हे वृत्त लिखाण करेपर्यंत ‘शिंदे यांचा सत्तेस्थापनेसाठी भाजपला पाठिंबा’, अशी माहिती वृत्तवाहिनांमध्ये ब्रेकिंगच्या नावाखाली झळकत हाेती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समाज माध्यमांद्वारे बंडखाेरांना काल भावनात्मक आवाहन करत ‘वर्षा’ बंगाल साेडून ‘माताेश्री’वर परतले. राज्यातील राजकीय घडामाेडींना वेग येत असताना राष्ट्रवादी काॅंग्रेसने देखील सावध पवित्रा घेतला आहे. पक्षाच्या सर्व आमदार आणि पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक घेऊन पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी या वेगान अस्थिर राजकीय घडामाेडीत काही सूचना दिल्या आहेत. शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील बैठकीत सहभागी झालेल्या आमदारांना मार्गदर्शन केले. अहमदनगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे देखील नेते अजित पवार यांच्याबराेबर बैठकीत उपस्थित हाेते. राज्य पातळीवर हाेत असलेल्या वेगवान राजकीय घडमाेडीची माहिती त्यांनी दिली आहे.

संग्राम जगताप म्हणाले, “शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार यांनी आमदारांना या बैठकीत मार्गदर्शन केले. पुढील वाटचालीची भूमिका सांगितली. महाविकास आघाडी सरकारची भूमिका विशद करत या राजकीय घडामाेडीत राष्ट्रवादी निर्णायक भूमिकेत राहणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबराेबर राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या माध्यमातून ठामपणे उभी राहणार आहे, अशा सूचना पक्षश्रेष्ठींनी या बैठकीत दिल्या”. पक्षश्रेष्ठींच्या सूचनेप्रमाणे राज्यातील राष्ट्रवादीचे सर्व आमदार एकसंघ आहेत, असेही जगताप यांनी सांगितले.

राज्यात सत्तांतर हाेईल का? यावर संग्राम जगताप यांनी सावध प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे यांनी घेतलेली भूमिका आणि त्यांच्याबराेबर असलेले आमदार हा शिवसेना पक्षातंर्गत विषय येताे. राष्ट्रवादीच्या बैठकीत या शिवसेनेच्या अंतर्गत विषयावर काेणतीही चर्चा झाली नाही. सत्तांतर हा विषय देखील चर्चेत आला नाही. तसे काही झाल्यास सर्वांनाच कळेल. परंतु सध्या तरी उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनतेचे मुख्यमंत्री म्हणून सेवेत आणि कार्यरत आहेत.

संग्राम जगताप आज सकाळपासून निवडक कार्यकर्त्यांबराेबर मुंबईत आहेत. नेते अजित पवार यांच्याबराेबर ते अहमदनगर शहरातील विविध मुलभूत नागरी विकासांवर चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600