लोणार ( विजय गोलेछा) :-
लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथे अज्ञात व्यक्तीने पाच एकरातील सोयाबीनची सुडी पेटवून दिल्याची घटना उजेडात आली.
सविस्तर असे की, अर्जून आबाजी खोमणे वय 65 वर्ष यांनी आपल्या शेगाव पंढरपूर या पालखी मार्गाला लागुन असलेल्या पार्डा पाटी जवळील गट नं 306 मधील सहा एकर शेतामध्ये तूर व सोयाबीन हया पीकाची पेरणी केली होती.सोयाबीन पिकाची सोंगणी करून सोयाबीनची सुडी शेताच्या मधोमध लावली होती. ढगाळ वातावरणामुळे ताडपत्री ने झाकुन ठेवलेली सुडी बुधवार दिनांक 12 च्या रात्री अज्ञात व्यक्तीने पेटवून दिली. अर्जुन खोमणे हे सपत्नीक शेतातील नजिक असलेल्या टिनशेड मध्ये राहतात .
सकाळी उठल्यावर शेतात टिनशेडच्या मागे धुराचे लोट येताना त्यांना दिसले, ते पाहताच त्यांनी तिकडे धाव घेतली तर संपूर्ण सुडी जळुन खाक झाली होती. घटनेची माहिती त्यांनी तात्काळ पोलीस पाटील आसाराम खोमणे, तलाठी जगन बारबुदे परमेश्वर नरवाडे, सिद्धेश्वर सरकटे यांना दिली घटनेचा पंचनामा तलाठी यांनी केला असून पाच एकरातील किमान 45 पोत्याची सोयाबीन सुडी, खाली व वर झाकलेली ताडपत्री एकुण दोन लक्ष दहा हजारांचे नुकसान झाल्याचा अहवाल वरिष्ठाकडे पाठविणार असल्याचे सांगितले आहे. शेती हेच त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन असून आता कुटुंबाचा चरितार्थ कसा करावा व घेतलेले कर्ज कसे परत करावे याची चिंता त्यांना लागली असुन नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
परिसरात सोयाबीनच्या गंजीवर झाकलेल्या ताडपत्री चोरिच्या घटनाही घडल्या असुन दिगंबर देवराव उरदुखे व श्रीराम उरदुखे यांच्या पालखी मार्गावरील शेतातील सोयाबिनच्या गंजीवर झाकलेल्या 3 ताडपत्र्या अज्ञात चोरट्याने लंपास केल्या आहेत. यामुळे परिसरातील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

