इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांना महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ यांच्यावतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातप्रमाणपत्र मिळण्यास होत असणाऱ्या विलंबाबाबत दिले निवेदन पत्र.
  इंदापूर प्रतिनिधी:महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ यांच्यावतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातप्रमाणपत्र मिळण्यास होत असणाऱ्या विलंबाबाबत 
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बार्टी पुणेचे  
  व्यवस्थापकीय संचालक किशोर गजभिये यांच्यासह इंदापूर तालुक्याचे आमदार व माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे व इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष सुहास मोरे यांनी निवेदन पत्र दिले.
त्यांनी दिलेल्या निवेदन पत्रात नमूद केले आहे की,वरील विषयांन्वये आपणास विनंती करण्यात येते की गेल्या दहा वर्षापासून राज्य शासनाने जिल्हास्तरीय जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याकरिता कार्यालये उघडली असली तरी सहजासहजी जातीचे प्रमाणपत्रे मिळत नाहीत. उल्लेखनीय बाब म्हणजे घरात एखाद्याचे जातीचे वैधता प्रमाणपत्र असून सुद्धा कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तींना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवत असताना पुन्हा एकदा चौकशीचे कारण पुढे करून अडवणूक केली जात आहे.राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने एका दिवसात जात प्रमाणपत्र दिले जातील, असे आवाहन केले होते. परंतु प्रत्यक्षात कित्येक कार्यालयात एका दिवसात साधा अर्जही स्वीकारून घेतला जात नाही. जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे दूरच राहिले. त्यामुळे शासनाच्या या आवाहनाला हरताळ फासण्याचे काम केले जात आहे. मुलांच्या शैक्षणिक प्रवेशाकरिता तसेच नोकरी विषयक प्रमाणपत्राकरता जात प्रमाणपत्र पडताळणी करणे आवश्यक असते. त्याकरिता कार्यालयात मोठी गर्दी झालेली असते. परंतु कोणतेतरी कारण दाखवून प्रकरणे नाकारण्याचा सपाटा सुरू असतो.'समाधान' झाल्याशिवाय जात पडताळणी प्रमाणपत्रे दिली जात नाहीत. शैक्षणिक प्रवेशाकरिता वेळेत जात पडताळणी प्रमाणपत्रे देणे आवश्यक असते. वेळेत प्रमाणपत्र सादर केली नाही तर मुलांची वर्ष वाया जाऊ शकतात.  जात पडताळणी प्रमाणपत्र जात पडताळणी समितीत सर्व अधिकारी कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक असते.बऱ्याच वेळा तिन्ही अधिकारी एका वेळेस उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे सुद्धा नागरिकांची फार मोठी गैरसोय होते.  विद्यार्थ्यांची शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक गैरसोय होत आहे. आपणास विनंती विद्यार्थ्यांना जातप्रमाणपत्र प्राथमिक शिक्षण घेत असताना शाळेत देण्यात यावी व जात प्रमाणपत्र देण्यास विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा सर्व सामाजिक संघटना ,पालक यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी ही नम्र विनंती.