शिर्डी (प्रतिनिधी) :
देशातील सर्वांत मोठ्या महापशुधन एक्स्पोचे शिर्डी येथे आयोजन करून शिर्डीचे नाव जागतिक पटलावर सुवर्णाक्षरांनी कोरले गेले. उत्कृष्ट नियोजन व चोख व्यवस्था व शिर्डीस मान दिल्याबद्दल शिर्डी शिवसेनेतर्फे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांचा शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख अनिताताई जगताप आणि विजय जगताप यांनी अभिनंदन करीत सत्कार केला.
आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र शिर्डी शहरात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नाने भारतातील सर्वात मोठा पशुधन मेळावा मोठ्या उत्साहाने पार पडला. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के, खा. सदाशिव लोखंडे, खा. डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, महानंदा दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, आ. मोनिका राजळे, आ. राहुल कुल, आ. जयकुमार गोरे, वैभव पिचड, विवेक कोल्हे आदींसह पशुसंवर्धन विभागाचे सचिव, आयुक्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एक्स्पो महापशुधन समारोपप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विखे पिता-पुत्राचे कौतुक केले. तसेच शिर्डी विकास अंतर्गत श्री साई थीम पार्क व इतर विकासकामांसाठी मंत्री विखे पाटलांनी ५० कोटी रुपयांची मागणी केली. त्यास मुख्यमंत्र्यांनी त्वरित अनुमती देऊन शिर्डीच्या
विकासासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली. शिर्डी व परिसरासाठी विखे पाटील परिवार शिर्डी शहराच्या विकासासंदर्भात सदैव तत्पर असतात. विखे पाटील परिवाराच्या योगदानामुळे शिर्डी व परिसराचा विकास होतो असे गौरवोद्गार मुख्यमंत्री व ग्रामविकासमंत्री यांनी काढून त्यांचे भरभरून कौतुक केले. एवढा प्रचंड मोठा पशुधन मेळावा आयोजित केला म्हणून विखे पाटील परिवाराची वेळ घेऊन शिर्डी शिवसेनेतर्फे ( शिदे गट) व जगताप पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी शहरात नागरी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना नेते व माजी उपनगराध्यक्ष विजयराव जगताप पा. यांनी दिली.

