राजेंद्र बनकर - शिर्डी 
पोलिस नसतांनाही पल्सर मोटरसायकलवर पुढे पोलीसांचे चिन्ह व मागे पोलीस नांव टाकून मिरवणा-या नाशिकच्या दोघांवर शिर्डी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.यापुढे अशाप्रकारे शासकीय कार्यालयाचे नांव वापरून कोणी फिरत असेल तर त्याची गय केली जाणार नसल्याचे शिर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी इशारा दिला आहे.

दरम्यान शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत मोटरसायकल चोरी, चैन स्नॅचिंग,आदी गुन्ह्यांस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेळोवेळी नाकाबंदी व गस्त घालून कारवाई करणे बाबत आदेश पारित केला आहे. 

त्यानुसार दिनांक २३ जुलै रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील आरबीएल चौक येथे नाकाबंदी दरम्यान शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी पो.ना.गोराणे,पो.कॉ.बाचकर असे नाकाबंदी करत असतांना यादरम्यान विनाक्रमांकाची लालकाळया रंगाची पल्सर मोटरसायकल आल्याने सदर मोटरसायकल थांबवून त्या मोटरसायकलची पाहणी केली असता, त्या पल्सरवर पोलीस विभागाचा लोगो व पाठीमागे पोलीस नांव दिसून आले.

सदर चालकास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव गौरव विजय गायकवाड असे सांगितले. सदरच्या मोटरसायकलचे मालक कोण आहे याबाबत विचारले असता त्याने मोटरसायकल माझ्या मित्राची असून तो पोलीस असल्याचे सांगितले.यानंतर पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी गाडी मालक याचा फोन क्रमांक घेऊन विचारणा केली असता त्या इसमाने तो नासिक येथे पोलीस पदावर कार्यरत आहे असे सांगितले.सदर वाहनाबाबत पोलीस निरीक्षक दुधाळ यांना संशय आल्याने हे वाहन पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले होते.दि.२४ जुलै रोजी सदरील मोटार सायकल सोडविण्याकरता अभिजीत शंकर पारदे हा इसम आल्यावर त्याची चौकशी केली असता तो एका खाजगी कंपनीत काम करत असल्याचे त्याने सांगितले.त्यावेळी गाडी ताब्यात मिळालेल्या गौरव गायकवाड यास तुझा पोलीस मित्र कोठे आहे याबाबत विचारले असता त्याने काल फोनवर बोललेला व्यक्ती अभिजीत पारदे हाच असल्याचे सांगितले.

त्यामुळे सदर इसमांनी पोलीस खात्यात नसतांनाही खाजगी मालकीचे पल्सर मोटरसायकलवर पुढे व मागे पोलीस चिन्ह व नांव देऊन पोलीस असल्याचे खोटे सांगून फसवणूक केल्याने इसम नामे गौरव विजय गायकवाड वय.२८ वर्ष, धंदा खाजगी नोकरी,रा. दत्तनगर, सिडको, नाशिक व अभिजीत शंकर पारदे वय वर्ष २८ धंदा खाजगी नोकरी रा.नेवासा फाटा नेवासा,जि. अहमदनगर.हल्ली मुक्काम नाशिक यांच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल भागवत बाचकर शिर्डी पोलीस स्टेशन यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात गुरनं ६५२ /२०२३ भादवी कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून वरील आरोपी यांना अटक करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी करत आहे. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. खाजगी वाहनांवरती शासकीय कार्यालयाचे नांव टाकून वाहने वापरू नये, तसेच संशयित वाहने अगर संशयित इसम आढळून आल्यास शिर्डी पोलीस स्टेशनला संपर्क करावा असे आवाहन शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी नागरीकांना केले आहे.

संकलन;
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111