अहमदनगर वृत्तसेवा:
राज्यातील युवक युवतींना मागणीवर आधारित (Demand driven) कौशल्य प्रशिक्षण पुरविण्यासाठी "कौशल्याची मागणी सर्वेक्षण मोहिम ३१ जुलै २०२३ पर्यंत राबविण्यात येत आहे. यासाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आला असून या फॉर्मची लिंक https://forms.gle/kYiSxbVhrZ2s776q8 अशी आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विविध शाखेतील विद्यार्थी, शालेय, महाविद्यालयीन शिक्षणातून गळती झालेले,शिक्षण सोडलेले नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार व समाजातील वंचित घटकातील उमेदवारांनी "कौशल्याची मागणी सर्व्हेक्षण" गुगल फॉर्म वर जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ३१ जुलै २०२३ पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नि.ना. सूर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे..
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीमार्फत तयार करण्यात आलेल्या जिल्हा कौशल्य विकास आराखड्याच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान व किमान कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम यासह केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरिता राज्यातील युवक युवतींना आवश्यक असलेले आणि त्यांनी मागणी केलेले कौशल्य प्रशिक्षण प्रदान केल्यास उमेदवारांच्या प्रशिक्षणादरम्यान स्वारस्यामध्ये वृद्धी होऊन अनुपस्थितीचे प्रमाण कमी होईल आणि प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या अधिक प्रमाणात संधी उपलब्ध होतील, यादृष्टीने अधिकाधिक युवक-युवतींनी नोंदणी करावी, असेही कळविण्यात आले आहे.
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -9561174111

