अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ निर्भय, मुक्त व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व विभागांमधील अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने सर्व उप विभागीय अधिकारी व उप विभागीय पोलीस अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, उपजिल्हाधिकारी शाहू मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
दोन सत्रामध्ये पार पडलेल्या या कार्यशाळेच्या पहिल्या सत्रामध्ये उपजिल्हाधिकारी शाहू मोरे यांनी एफएसटी (फ्लाईंग स्कॉड), एसएसटी ( स्टॅटीक सर्व्हीलन्स टीम) सी व्हिजील ॲप इएसएमएस (इलेक्शन सिझर मॅनेजमेंट सिस्टीम) तसेच निवडणूक संबंधातील गुन्हे या विषयांवर तर दुसऱ्या सत्रामध्ये उपजिल्हााधिकारी अतुल चोरमारे यांनी एमसीसी (मॉडेल कोड ऑफ कंडक्ट), मिडिया कम्प्लेंट, एमसीएमसी (मिडिया मॉनटिरींग अँड सर्टीफिकेशन कमिटी), सुविधा ॲप्लीकेशन तसेच क्रीटीकल पोलिंग स्टेशन या विषयावर सविस्तर अशी माहिती दिली.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी (निवडणूक) राहूल पाटील यांनीही निवडणुकीच्या अनुषंगाने उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.उपस्थित सर्व उप विभागीय अधिकारी तसेच उप विभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांच्या शंकाचे निरसनही या कार्यशाळेमध्ये करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा आढावाही उपस्थित अधिकाऱ्यांकडून घेतला.
कार्यशाळेस सर्व उप विभागीय अधिकारी, सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क श्रीरामपूर - 9561174111

