माता-पित्यांच्या कष्टाचे चीज
करा - डॉ. संजय मालपाणी
संगमनेर / प्रतिनिधी:
स्वतःमधील कला-गुणांना ओळखुन, मेहनतीच्या जोरावर उत्तुंग यश मिळवुन आपल्या माता-पित्यांच्या कष्टाचे चीज करा असे आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन तथा गीता परिवाराचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी केले.
आज महेश सत्संग मंडळाच्या वतीने येथील श्री बालाजी मंदिरामध्ये 10 वी व 12 वी मध्ये उज्वल यश संपादन करणार्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या माता-पित्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थ्यांचा सत्कार डॉ. मालपाणी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपिठावर महेश सत्संग मंडळाचे ज्येष्ठ सदस्य तथा कोषाध्यक्ष नंदकुमार झंवर, उपाध्यक्ष निशांत जाजू, सचिव आशिष राठी, संगमनेर माहेश्वरी तालुका सभेचे उपाध्यक्ष संजय आर. मालपाणी उपस्थित होते.
डॉ. मालपाणी पुढे म्हणाले कि 10 वी, 12 वी तील विशेष यश संपादन करणार्या विद्यार्थ्यांचा हा सन्मान समाजाच्या वतीने केला जात आहे, याचे विशेष महत्व असुन, सदर सत्कार ईश्वराच्या आशिर्वादाने संपन्न होत असल्यामुळे तुम्हा मुलांचे भविष्य उज्वल आहे यात शंका नाही. त्याचप्रमाणे ज्या घरामध्ये माता-पिता आणि आजी-आजोबा आहेत. त्या मुलांचे नशिब फार चांगले आहे. कारण ह्या दोन पिढी मुलांना घडवितांना कुंभार ज्या प्रमाणे मडके घडवितांना आतुन व बाहेरून हाताने आकार देतो. त्याप्रमाणेच आजी-आजोबा या मुलांना आधार देण्याचे काम करतात तर माता-पिता काहीशा कडक स्वभावाने मुलांचे भविष्य बनवितात. अशा दोन पिढीच्या साथीने घडणार्या पिढीचे भविष्य निश्चितच उज्वल असते.
भविष्यात तुम्ही बाहेरगावी उच्च शिक्षणासाठी जाल त्यावेळी अॅट्रॅक्शन, अॅडिक्शन पासुन दुर राहुन स्वतःच्या भविष्याचा आणि आपल्यासाठी माता-पिता करीत असलेल्या कष्टाचा विचार करा, असा सल्लाही त्यांनी दिला. ज्यांना कमी गुण प्राप्त झाले, त्या माता-पित्यांनी व मुलांनी घाबरून जायचे नाही. अशा मुलांनी आपल्या कलागुणांनुसार मार्गक्रमण करायचे, भरपुर कष्टाची तयारी ठेवायची आणि माता-पित्यांनी त्यांना साथ द्यायची. कारण सध्या वेगवेगळ्या क्षेत्रात देखील उज्वल करिअर करता येत असल्याचे डॉ. मालपाणी यांनी सांगतांना पायलट स्वप्निल बाहेती, संगीत क्षेत्रात पदवी संपादन करणारा अक्षय बाहेती यांची उदाहरणे देखील दिली.
यावेळी उज्वल यश संपादन करणारे यश करवा, साची राठी, हिमांशु नावंदर, तन्वी कलंत्री, प्राजक्ता कासट, प्रिशा नावंदर, पवित्र कासट, अक्षरा तापडे, प्राची कासट यांच्यासह त्यांच्या माता-पित्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन बाहेती यांनी केले, तर उपस्थितांचे आभार आशिष राठी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महेश सत्संग मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार राजेश जेधे (सर) संगमनेर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111