shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोलमध्ये रोटरी क्लबची स्थापना – सामाजिक सेवेसाठी नवा संकल्प

एरंडोलमध्ये रोटरी क्लबची स्थापना – सामाजिक सेवेसाठी नवा संकल्प

एरंडोल (प्रतिनिधी):
एरंडोल शहरात रोटरी क्लबची स्थापना होऊन पदग्रहण सोहळा डी.डी.एस.पी. महा विद्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडला. या वेळी डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी चार्टर अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली तर प्रा. सोपान साळुंखे यांनी मानद सचिवपदाचा कार्यभार सांभाळला.

या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून रोटरी प्रांतपाल रो. ज्ञानेश्वर शेवाळे (३०३०), माजी प्रांतपाल रो. मंजू फडके आणि सहप्रांतपाल धनराज कासट उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य प्रवर्तक ऍड. ओम त्रिवेदी यांनी केले.

रो. ज्ञानेश्वर शेवाळे यांनी रोटरी इंटरनॅशनलचा १०० वर्षांचा परंपरागत इतिहास, २०० पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत असलेली ही जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था असल्याचे सांगितले. त्यांनी “सेवा सर्वोपरी” या ध्येयाने चालणाऱ्या रोटरीतर्फे शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि वंचित घटकांसाठी राबविल्या जाणाऱ्या प्रकल्पांची माहिती दिली.

रो. मंजू फडके यांनी मार्गदर्शन करताना “रोटरियन” झाल्यावर व्यक्तिमत्त्वात आणि व्यवसायात होणाऱ्या सकारात्मक बदलांचा उल्लेख केला. तसेच जगातील सर्वात यशस्वी ठरलेली “पोलिओ निर्मूलन मोहीम” ही रोटरीच्या योगदानामुळे शक्य झाल्याचे सांगून एरंडोल रोटरी क्लबकडून समाजहिताच्या उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली.

नवीन अध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या मनोगतात “सामाजिक सेवेतून समाधान” हा मंत्र जपत कार्य करण्याचे आश्वासन दिले. कोषाध्यक्ष म्हणून अरुण माळी, वैद्यकीय समिती प्रमुख म्हणून डॉ. फरहाज बोहरी तसेच इतर पदाधिकाऱ्यांनीही कार्यभार स्वीकारला. मानद सचिव प्रा. सोपान साळुंखे यांनी पारदर्शकता व सातत्यपूर्ण कार्याचा निर्धार व्यक्त केला.

या वेळी व्यासपीठावर जळगाव सेंट्रल क्लबचे अध्यक्ष रो. जितेंद्र बरडे, मानद सचिव केतन ढाके, महेंद्र रायसोनी यांच्यासह पाचोरा व जळगाव क्लबचे पदाधिकारी, तसेच एरंडोल शहरातील मान्यवर उपस्थित होते. शहरातील पत्रकारही मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.

सोहळ्याचे सूत्रसंचलन जळगाव सेंट्रल रोटरी क्लबच्या अपर्णा भट–कासार यांनी केले तर आभारप्रदर्शन एरंडोल रोटरी क्लबच्या उपाध्यक्षा डॉ. जुमाना बोहरी यांनी केले.

close