जळगांव – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बकरी व बोकड चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करत ३ आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुद्देमालासह रोख रक्कम व दोन मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
फिर्यादी सैय्यद परवेज सैय्यद आसिफ यांनी दिलेल्या तक्रारीवरून २७ ऑगस्ट रोजी ७,००० रुपयांचा बोकड व ६,००० रुपयांची बकरी अज्ञात व्यक्तींनी चोरल्याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गणेश वासुदेव जाधव (२०), गणेश अशोक पाटील (२१) व अक्षय विजय वंजारी (२३) सर्व रा. चिंचोली यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी बकरी व बोकड चोरीची कबुली दिली तसेच एमआयडीसी हद्दीतूनही ३ बकऱ्या चोरी केल्याचे उघड केले.
चोरलेला बोकड खाटीक राहुल राऊळकर याला विकल्याचे त्यांनी सांगितले असून, पोलिसांनी बकरी जिवंतावस्थेत जप्त केली व बोकडाची विक्री झालेली रोख रक्कम हस्तगत केली. तसेच चोरीसाठी वापरलेल्या दोन मोटरसायकलीही पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक शरद बागल व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास शनिपेठ पोलीस ठाण्याचे पथक करीत आहे.


