श्री.गणेश वंदना,भांगडा,पावरी, लेझीम नृत्यांनी रंगत वाढवली.
एरंडोल (प्रतिनिधी) – एरंडोल येथील रा. ति. काबरे विद्यालयात पाच दिवसीय गणेशोत्सवाचे औचित्य साधून गणपती विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी एकत्र येऊन मिरवणुकीला भव्य स्वरूप दिले.
मिरवणुकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या वेळी एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. शरदचंद्रजी काबरे, सचिव मा. श्री. राजीवजी मणियार, डॉ. नितिनजी राठी, मा. श्री. सतीश परदेशी, मा. श्री. अरुण पाटील, मा. श्री. नितीनजी बिर्ला, मा. श्री. अनिलजी बिर्ला, मा. श्री. धिरजभाऊ काबरे, मा. श्री. राजेंद्रजी लढे, मुख्याध्यापक श्री. एस. एस. राठी, उपमुख्याध्यापक श्री. पी. एच. नेटके, पर्यवेक्षक श्री. पी. एस. नारखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.
ढोल-ताशांच्या गजरात आणि “गणपती बाप्पा मोरया” च्या जयघोषात मिरवणुकीस सुरुवात झाली. शाळेतील गणपतीची सुशोभित मूर्ती ही फुलांनी आणि रंगीबेरंगी सजावटीने सजवलेल्या रथात विराजमान होती. इयत्ता ८वी ते १०वीतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला.
मिरवणुकीत शाळेच्या सांस्कृतिक विभागाने सादर केलेल्या गणेश वंदना नृत्य, भांगडा, पावरी, लेझीम तसेच भक्तिगीतांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. मिरवणूक गावातील मुख्य मार्ग, भगवा चौक, मारवाडी गल्ली, पांडव वाडा, राममंदिर मार्गे मार्गस्थ झाली. शेवटी विधिवत पूजा, आरती करून गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. त्या वेळी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी एकत्र येऊन “पुढच्या वर्षी लवकर या” अशी भावपूर्ण प्रार्थना केली.
मुख्याध्यापक श्री. सुनील राठी यांनी सांगितले की, “गणेशोत्सव हा आमच्या शाळेचा महत्त्वाचा सांस्कृतिक उत्सव आहे. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सामूहिक कार्यभावनेतून मिरवणुकीला यशस्वी केले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक मूल्यांची जपणूक होते.”
स्थानिक नागरिक व पालकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शाळेच्या या भक्तिमय आणि उत्साही मिरवणुकीने परिसरात गणेशोत्सवाचा उत्साह द्विगुणित केला. रा. ति. काबरे विद्यालयाने आपल्या सांस्कृतिक व सामाजिक बांधिलकीचे आणखी एकदा दर्शन घडवले.






