प्रतिनिधी – एरंडोल :
अकोला शहरातील गुलजार पुरा भागात राहणाऱ्या भटक्या विमुक्त जमातीतील भोई समाजाच्या एका गरीब कुटुंबातील १३ वर्षीय मुलीवर गुलजार पुरा भागातच राहणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तोहित समीर या इसमाने अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश विसर्जनासाठी पीडित मुलीचे कुटुंब बाहेर गेल्याची संधी साधून आरोपी तोहित समीरने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. विशेष म्हणजे सदर आरोपी हा यापूर्वीही अनेक गुन्ह्यांमध्ये जेलमध्ये जाऊन आल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे स्थानिक परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर मुलीचे कुटुंब गुलजार पुरा भागात धाकात राहत असल्याचे समजते. या घटनेनंतर आरोपी सध्या फरार असून, त्याचा तात्काळ शोध घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी भोई समाजाकडून करण्यात आली आहे.
या संदर्भात राष्ट्रीय भोई एकता संघ आणि समस्त भोई समाजाने निवेदन सादर केले असून, पोलिस अधिकाऱ्यांनी आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
याप्रसंगी निवेदन देताना राष्ट्रीय भोई एकता संघाचे अध्यक्ष अशोक मोरे, माजी नगरसेवक शेणपडू वाल्डे, युवा मंचाचे अध्यक्ष नरेश भोई, ज्येष्ठ पदाधिकारी उखर्डू वाल्डे सर, सामाजिक कार्यकर्ते वेंडर पी.डी. मोरे, गोविंदा आप्पा वाल्डे, दिलीप वाल्डे, किशोर भोई, विलास वाल्डे तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रकरणी पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध घ्यावा, त्याला अटक करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
(टिप:- वरील सविस्तर माहिती दिलेले आणि निवेदनानुसार आहे.)


