शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
श्रीरामपूर विभागाचे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी काल दिवसभर शिर्डीत तळ ठोकून अलर्ट मोडवर येत शेकडो वाहने, मंदिर परिसरात धंदा करणारे १२ अल्पवयीन मुले व त्यांचे पालक तसेच वेश्याव्यवसाय चालत लॉजिंगचा पर्दाफाश केला.
वाकचौरे यांनी आदेश देताच शिर्डी पोलिसांनी कोते गल्लीतील क्रांती लॉजवर छापा टाकत देहविक्री करणाऱ्या महिलांना पकडून तेथील व्यवस्थापक बनसोडे व चालक मालकावर पिटांतर्गत गुन्हे दाखल केले. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश येसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेने मोठ्या प्रमाणात कारवाई करत शेकडो वाहनांवर कारवाई केली.
शिर्डी जागतिक किर्तीचे देवस्थान असल्याने भारतातील वेगवेगळ्या राज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे श्री साई बाबा मंदिर परिसरात बरेच लोक फोटो विक्री, मूर्ती विक्री, फुले, हार प्रसाद विक्री, गंध लावणे इत्यादी व्यवसाय करतात व त्यावर अर्थार्जन करतात. काही पालक मात्र जाणीवपूर्वक आपल्या अल्पवयीन मुलांना आर्थिक प्राप्तीसाठी मंदिर परिसरात भीक्षा मागणे, फोटो विक्री, मूर्ती विक्री, फुले-हार-प्रसाद विक्री, गंध लावणे आदी कामे करण्यास भाग पाडतात. बालकांना त्यांचे पालक हे अनावश्यक शारीरिक व मानसिक कष्ट देऊन जाणीवपूर्वक त्यांना उघड्यावर सोडून त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. बालकांचे वय पाहता त्यांना चांगल्या पध्दतीचे शिक्षण देणे गरजेचे आहे. परंतु ते मुले-मुली शाळेत न जाता वरीलप्रमाणे कामे करताना दिसून येत असताना १२ बालके (१० मुले, २ मुली) यांच्यावर कारवाई करण्यात आली. यापुढे शिर्डीत कोणतेही गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, अशा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
यापुढे अल्पवयीन बालके मंदिर परिसरात काही व्यवसाय करताना आढळल्यास त्यांच्या पालकावर किंवा आई-वडिलांवर गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकण्यात येणार आहे.असे निक्षून सांगितलं आहे.

