शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा
अहिल्यानगर (दि. १२ सप्टेंबर) : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू झाली असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणुकीच्या तयारीत प्रशासनाने गती आणली आहे. याच पार्श्वभूमीवर आज (ता. १२) मुंबई येथे राज्यपालांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद अध्यक्षपदांच्या आरक्षणाची राज्यस्तरीय सोडत काढण्यात आली. या सोडतीत अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव ठरले आहे.
👉 राजकीय समीकरणात उलथापालथ
या निकालामुळे जिल्हा परिषदेच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत. आतापर्यंत अध्यक्षपद मिळविण्यासाठी वेगवेगळ्या गटांनी पक्क्या राजकीय चाळणी सुरू केली होती. मात्र, हे पद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव ठरल्यानंतर अनेक दिग्गज नेत्यांच्या गणितांना धक्का बसला आहे.
👉 इच्छुकांना नवा उत्साह
जिल्हा परिषदेतील गट-गण रचनेची प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच गट-गण रचनेच्या आरक्षणाची सोडतही होणार आहे. परंतु त्याआधीच अध्यक्षपद आरक्षित झाल्याने अनुसूचित जमाती समाजातील महिला उमेदवारांमध्ये उत्सुकता व आनंदाचे वातावरण आहे. आगामी निवडणुकीत या पदासाठी महिलांचा आत्मविश्वास वाढणार असून नव्या नेतृत्वाला वाव मिळणार आहे.
👉 राजकीय चढाओढ रंगणार
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे नेहमीच प्रतिष्ठेचे मानले जाते. विकासकामांवर परिणाम करणाऱ्या या पदासाठी आतापर्यंत अनेक ज्येष्ठ नेत्यांची तयारी होती. पण आता परिस्थिती बदलली असून अनुसूचित जमातीतील महिला नेतृत्वावर सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील काही दिवसांत या पदासाठी इच्छुक उमेदवारांमध्ये जोरदार चढाओढ होईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
००००

