आशिया चषक २०२५ मध्ये सर्वांच्या चर्चेचा व आकर्षणा केंद्रबिंदू बनलेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गट फेरीचा सामना रविवार, १४ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. टीम इंडियाने युएईविरुद्ध ९ गडी राखून विजय मिळवत आपल्या मोहिमेची सुरुवात केली. तर पाकिस्ताननेही नवख्या ओमानविरुद्ध विजय मिळवून बऱ्यापैकी सुरुवात केली. या स्पर्धेच्या इतिहासात, दोघांनी एकमेकांविरुद्ध १८ सामने खेळले आहेत. त्यापैकी भारताने १० आणि पाकिस्तानने ६ सामने जिंकले. तथापि, गेल्या १० वर्षांत ही स्पर्धा एकतर्फी झाली, जिथे पाकिस्तानला ७ सामन्यांपैकी फक्त एकदाच विजय मिळवता आला.
आशिया चषक सन १९८४ पासून खेळविला जात आहे. यामध्ये भारताने ८ आणि पाकिस्तानने २ विजेतेपदे मिळविली आहेत, परंतु दोन्ही संघ कधीही अंतिम फेरीत एकमेकांसमोर येऊ शकले नाहीत. सन १९८४ मध्ये पहिल्यांदाच आशिया चषक खेळवण्यात आला, त्यावेळी फक्त भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका सहभागी झाले होते. भारताने शारजाहमध्ये पाकिस्तानला ५४ धावांनी हरवले आणि नंतर राउंड रॉबिन स्वरूपात जिंकून विजेतेपद पटकविले. तेव्हा श्रीलंका उपविजेता होता आणि पाकिस्तान तिसऱ्या स्थानावर होता.
सन १९८४ पासून, एकदिवसीय आणि टी२० आशिया चषकात दोन्ही संघांमध्ये १८ सामने खेळले गेले आहेत. त्यातील भारताने ५६% म्हणजे १० जिंकले, तर पाकिस्तानने ६ सामने जिंकले. सन १९९७ आणि २०२३ मध्ये दोन्ही संघांमधील १-१ सामना देखील अनिर्णीत राहिला. आशिया चषक १४ वेळा एकदिवसीय आणि २ वेळा टी२० स्वरूपात खेळविण्यात आला. या काळात, दोघांमध्ये एकदिवसीय स्वरूपात १५ सामने खेळले गेले. भारताने ८ जिंकले आणि पाकिस्तानने ५ जिंकले. या दरम्यान, २ सामनेही अनिर्णीत राहिले. म्हणजेच भारताने ५३% एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानला हरवले.
टी२० आशिया चषकात सन २०१६ मध्ये मीरपूरच्या मैदानावर दोन्ही संघ पहिल्यांदाच आमने सामने आले. भारताने हा सामना ५ गड्यांनी जिंकला. सन २०२२ मध्ये दुबईमध्ये दोघांमध्ये २ टी२० सामने खेळले गेले. भारताने पहिला सामना जिंकला आणि पाकिस्तानने दुसरा सामना ५ विकेट्सने जिंकला. गेल्या १० वर्षात पाकिस्तानचा भारतावर हा एकमेव विजय होता. या दरम्यान भारताने ५ सामने जिंकले. भारताचा विराट कोहली आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने फक्त ८ सामन्यांमध्ये ६८ च्या सरासरीने ४७६ धावा केल्या आहेत. यामध्ये २ शतके आणि १ अर्धशतक समाविष्ट आहे. सन २०२३ च्या आशिया कपमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात विराटने शतकही ठोकले होते. त्याने २०१२ मध्ये १८३ धावांची खेळी करत भारताला एकहाती विजयही मिळवून दिला आहे.
एकूण सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराटनंतर रोहित शर्माने ४७४ धावा केल्या आहेत. तथापि, टी-२० निवृत्तीमुळे हे दोन्ही खेळाडू आशिया कप संघाचा भाग नाहीत. सध्याच्या संघात हार्दिक पंड्याने पाकिस्तान विरुद्ध टी-२० आशिया कपमध्ये ३३ आणि सूर्यकुमार यादवने ३१ धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत, भारताच्या युवा फलंदाजी चमूला कठीण आव्हानाला सामोरे जावे लागू शकते. भुवनेश्वर कुमार हा आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्धचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याने ५ सामन्यात १० बळी घेतले आहेत. मात्र, तो संघाचा भाग नाही. त्याच्यानंतर फिरकी गोलंदाज कुलदीप आणि हार्दिक पंड्या यांच्या नावावर प्रत्येकी ८ बळी आहेत. दोघेही आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना दिसतील. हार्दिकने ७ आणि अर्शदीप सिंगने टी-२० आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध ३ बळी घेतले आहेत.
पाकिस्तानच्या फक्त एकाच फलंदाजाने आशिया कपमध्ये भारताविरुद्ध ४०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. शोएब मलिकने ६ सामन्यात ४३२ धावा केल्या आहेत. युनूस खान २३८ धावा करून दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा गोलंदाज आहे. सध्याच्या संघाचा भाग असलेल्या फखर जमानने ६ सामन्यात ८३ धावा केल्या आहेत. मोहम्मद रिझवान टी-२० आशिया कपमध्ये ११४ धावा करून अव्वल स्थानावर आहे, पण तो संघातही नाही. त्याच्यानंतर, मोहम्मद नवाजने २ सामन्यात ४३ धावा केल्या आहेत. सन २०२२ च्या आशिया कपमध्ये, त्याने ४२ धावा करून पाकिस्तानला भारताविरुद्ध विजय मिळवून दिला. आशिया कपमध्ये भारताविरुद्ध पाकिस्तानचा सर्वोत्तम गोलंदाज फिरकी गोलंदाज सईद अजमल आहे, त्याने ४ सामन्यात ८ बळी घेतले आहेत. त्याच्यानंतर, नसीम शाहने ६ आणि शाहीन शाह आफ्रिदीने ५ बळी घेतले आहेत. नसीमला संघात स्थान मिळाले नाही, परंतु शाहीन आणि हरिस रौफ १४ सप्टेंबर रोजी सामना खेळताना दिसतील. मोहम्मद नवाज ४ बळींसह टी-२० मध्ये अव्वल स्थानावर आहे.
आशिया कपचा १७ वा हंगाम यूएईमध्ये खेळला जात आहे. आतापर्यंत, भारत आणि पाकिस्तान दोघांनीही १६ स्पर्धात प्रत्येकी एकदा या स्पर्धेवर बहिष्कार टाकला आहे. १५ पैकी ८ वेळा भारताने ही स्पर्धा जिंकली आणि संघ ३ वेळा उपविजेता ठरला. म्हणजेच, भारत फक्त ४ वेळा अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. या सर्व स्पर्धांमध्ये पाकिस्तानने विजेतेपदाचा सामना खेळला. मागील १५ स्पर्धात पाकिस्तानने फक्त दोनदाच विजेतेपद मिळविले. सन २००० मध्ये श्रीलंकेला आणि २०१२ मध्ये बांगलादेशला अंतिम फेरीत हरवून संघाने विजेतेपद जिंकले. २०२२, २०१४ आणि १९८६ मध्येही संघ उपविजेता राहिला होता, परंतु विजेतेपदासाठी भारताशी कधीही टक्कर देऊ शकला नाही. यावेळी ४८ वर्षे जुन्या स्पर्धेत ८ संघ सहभागी होत आहेत, परंतु यावेळी दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघ एकत्रितपणे अंतिम फेरीत पोहोचू शकतील का हा औत्सुक्याचा विषय असला तरी मागील काही दिवसात दोन्ही देशांत मधील संबंध बिलकुल चांगले नाहीत. शिवाय पहलगाम हल्ला व ऑपरेशन सिंदूर नंतर कोट्यावधी भारतीयांचा पाकविरूध्द खेळण्यास स्पष्ट विरोध आहे. तरी सर्व विरोध झुगारून बीसीसीआयने पाकविरुद्ध खेळण्यास हिरवा कंदिल दिल्याने बीसीसीआय व पर्यायाने भारत सरकार देशप्रेमी लोकांच्या रोषाच्या रडारवर आले. एव्हाना या दोन संघातील सामन्यांचे तिकीट हातोहात विकले जातात. मात्र हा लेख लिहीला जाईपर्यंत फक्त ५० टक्के तिकिट विक्री झाली होती. याचा अर्थ पाकिस्तान विरूद्ध खेळण्यास भारतीय क्रिकेट रसिकांचा प्रखर विरोध आहे.
@ डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२.