![]() |
| गणेशोत्सवा निमित्त रांगोळी स्पर्धेत कलाकृती सादर करताना विद्यार्थी. |
प्रतिनिधी – पिंपळे पिंपळे येथे श्री शनेश्वर मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यात रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, संगीत खुर्ची व चित्रकला स्पर्धांचा समावेश होता. या स्पर्धांमध्ये गावातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला.
विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त गुण उजागर व्हावेत आणि त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने मंडळाच्या वतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
रांगोळी स्पर्धा ठरली आकर्षणाचे केंद्र...
इयत्ता २ री ते ५ वीच्या विद्यार्थ्यांनी गणेशाच्या विविध रूपांची मांडणी रांगोळीच्या माध्यमातून केली. तर इयत्ता ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी “पाणी आडवा – पाणी जिरवा” तसेच “पर्यावरण समतोल” यांसारखे सामाजिक संदेश रांगोळीतून मांडले. पानाफुलांचा वापर करून विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक कलाकृती रंगविल्या. या कलाकृतींमुळे संपूर्ण परिसरात गणेशोत्सवाच्या उत्साहात पर्यावरण संवर्धनाचा संदेशही प्रभावीपणे पोहोचला.
इतर स्पर्धांना उत्स्फूर्त सहभाग...
चित्रकला व निबंध स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विविध कल्पनाशक्ती, रंगसंगती व विचारमंथनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपली कला व लेखनकौशल्य सादर केले. संगीत खुर्चीच्या खेळामुळे लहान मुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
मान्यवरांची उपस्थिती...
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ. वर्षा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी मिराबाई चौधरी, कल्याणी चौधरी, मानसी चौधरी, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील तसेच ओम साई क्लासेस चे संचालक ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते. मान्यवरांनी स्पर्धकांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
निकाल व पारितोषिक वितरण...
गावातील ज्येष्ठ व श्रेष्ठ मंडळींनी स्पर्धांचे परीक्षण करून त्याच ठिकाणी निकाल जाहीर केले. विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी ग्रामस्थ, महिला मंडळ व ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



