प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्या संकल्पनेतून यशस्वी उपक्रम...
एरंडोल (प्रतिनिधी):एरंडोल येथील प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्या संकल्पनेतून ‘श्री शिवछत्रपती वाटिका’ या नावाने वृक्षलागवडीचा एक आदर्श उपक्रम राबवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकास ३५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महसूल विभाग व वनविभागाच्या सहकार्याने म्हसावद रोडवरील शासकीय गोदामाजवळील ओसाड जमिनीवर सुमारे ४०० देशी जातींची झाडे लावण्यात आली.
या वाटिकेत चिंच, निंब, जांभूळ, सीताफळ, वड, पिंपळ, कडुलिंब आदी विविध वृक्षांची लागवड करण्यात आली असून, याचे नामकरण ‘श्री शिवछत्रपती वाटिका’ असे करण्यात आले आहे. प्रांताधिकारी गायकवाड यांनी कर्मचारी वर्गासह वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारून हा उपक्रम प्रत्यक्ष अंमलात आणला.
✅ संवर्धनासाठी ठोस पावले...
वृक्षांना जनावरांपासून संरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण परिसराला काटेरी कुंपण घालण्यात आले.
वनविभागाच्या मदतीने ठिबक सिंचन व्यवस्था बसवून पाणीपुरवठ्याची नियमित सोय केली.
सुटीच्या दिवशीही प्रांताधिकारी स्वतः कर्मचाऱ्यांसह पाहणी करून वृक्षांची वाढ योग्य प्रकारे होत आहे की नाही याची खात्री करतात.
वृक्ष संवर्धनाची जबाबदारी सेतू सुविधा केंद्राचे पिंटू राजपूत यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
🌱 एक वर्षानंतरचे यश...
वृक्षलागवडीला आता एक वर्ष पूर्ण झाले असून, वाटिकेतील सर्व झाडे हिरवीगार व सुस्थितीत दिसत आहेत. रविवारी (ता. ३१) प्रांताधिकारी गायकवाड यांनी पुन्हा पाहणी करून प्रतिनिधी आल्हाद जोशी (दै. ‘सकाळ’) व प्रा. सुधीर शिरसाठ (दै. ‘तरुण भारत’) यांच्या हस्ते पूरक वृक्षारोपण करून या उपक्रमाला चालना दिली. यावेळी परिसरातील गवत काढून स्वच्छता करण्याचे निर्देशही देण्यात आले.
👏 सर्वत्र कौतुक...
प्रांताधिकारी गायकवाड यांच्या पुढाकारातून ‘श्री शिवछत्रपती वाटिका’ आज हिरवाईने नटत असून महसूल प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे परिसराला नवीन सौंदर्य प्राप्त झाले आहे. या उपक्रमाचे समाजातील विविध स्तरातून स्वागत होत आहे.