एरंडोल – दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दादासाहेब अमित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. प्रमुख वक्ते म्हणून मूळजी जेठा महाविद्यालय, जळगावचे सहयोगी प्रा. डॉ. विजय लोहार उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात दादासाहेब अमित पाटील यांनी विद्यार्थ्यांनी मातृभाषेसोबत इतर भाषांमध्येही प्राविण्य मिळवणे गरजेचे असल्याचे सांगितले. रोजगाराच्या संधीसाठी बहुभाषिक ज्ञान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
मुख्य व्याख्यानात डॉ. विजय लोहार यांनी “हिंदी की अविरत प्रवाहित निर्मल धारा और हम” या विषयावर विचार मांडले. हिंदी ही विवादाची नव्हे तर संवादाची भाषा असल्याचे सांगत संतकालापासून ते स्वातंत्र्य चळवळीपर्यंत हिंदीचा प्रवास त्यांनी स्पष्ट केला.
या वेळी प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील, उपप्राचार्य डॉ. अरविंद बडगुजर यांची उपस्थिती होती. हिंदी विभागप्रमुख डॉ. स्वाती शेलार यांनी प्रास्ताविक केले. भाग्यश्री चौधरी व हर्षदा यांनी स्वागतगीत सादर केले. प्रा. सपना पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. किशोर सपकाळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. सविता पाटील व शेखर पाटील यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील तीनही शाखांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


