सुपर फोरसाठी आपले आसन आधीच आरक्षित केले असलेल्या टिम इंडियाने आपल्या ज्या खेळाडूंना आधीच्या सामन्यात खेळण्याची अथवा मॅच प्रॅक्टीसची संधी मिळाली नाही त्यांना ओमान विरूध्दच्या आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात ती उपलब्ध करून दिली. मात्र भारताकडून या सामन्यात प्रयोगांचा अतिभडीमार केला गेला. आपला हुकमी एक्का व सर्वात भरवशाचा फलंदाज अर्थात कर्णधार सुर्यकुमार यादव तर संघाला मोठ्या धावांची गरज असतानाही फलंदाजीला आलाच नाही. तर गोलंदाजीत २० षटकांच्या छोटेखानी खेळातही तब्बल आठ गोलंदाज वापरून पुढील फेरीतील सामन्यांसाठी सर्वच गोलंदाज व फलंदाजांना अजमावण्यात आले. शिवाय भारतीय संघ इतर सामन्यांप्रमाणे फारसा गंभीरही दिसला नाही. त्याचा परिणाम म्हणजे एकदम नवखा ओमान संघ एकवेळ उलटफेर तर करणार नाही ना ? असा प्रश्नही निर्माण झाला होता. मात्र भारतीय गोलंदाजांनी परिस्थिती फारशी हाताबाहेर जाणार नाही याची दक्षता घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
भारताने या सामन्यात ओमानचा २१ धावांनी पराभव करून आपला विजयी प्रवास सुरू ठेवला. शुक्रवारी अबू धाबी येथे खेळल्या गेलेल्या गट फेरीच्या शेवटच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि २० षटकांत ८ बाद १८८ धावा केल्या. प्रत्युत्तरात ओमानला त्यांच्या निर्धारित षटकांत ४ बाद १६७ धावाच करता आल्या. तथापि, आमिर कलीम आणि हम्माद मिर्झा यांनी ९३ धावांची भागीदारी केली आणि गोलंदाजांना आव्हान दिले, परंतु दोघांचेही प्रयत्न व्यर्थ गेले.
जतिंदर सिंगच्या नेतृत्वाखालील ओमान गट अ मध्ये शेवटच्या स्थानावर राहिला आणि सुपर चार टप्प्यासाठी पात्र ठरू शकला नाही. भारतापूर्वी, त्यांचा सामना संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि पाकिस्तानशी झाला, त्या दोन्ही सामन्यात त्यांना विजय मिळविता आला नाही.
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव जरा वेगळ्याच मूडमध्ये होता. प्रथम, तो नाणेफेकीच्या वेळी अर्शदीप सिंगचे नाव विसरला, नंतर तो संपूर्ण डावात पॅड घालून स्टँडमध्येच बसून राहिला पण फलंदाजीसाठी आला नाही. ओमानच्या गोलंदाजांनी याचा पुरेपूर फायदा घेतला.
उपकर्णधार शुभमन गिलवर भारतीय संघाला चांगली सुरुवात देण्याची जबाबदारी होती, परंतु सलग तिसऱ्या सामन्यात तो एक छोटीशी खेळी करून डग आऊट परतला. दुसऱ्याच षटकात शाह फैझलने त्याला फक्त पाच धावांवर त्रिफळाचित केले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनने जबाबदारी सांभाळली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ३४ चेंडूत ६६ धावांची भागीदारी केली, ती जितेन रामानंदीने तोडली. त्याने सलामीवीर अभिषेकला विनायक शुक्ला करवी झेलबाद केले. तो १५ चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकारांसह ३८ धावा करून बाद झाला.
चाहते सूर्यकुमार यादवच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होते, पण तसे झाले नाही. हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव यांनाही फलंदाजीसाठी पाठवण्यात आल्यानंतर परिस्थिती आणखी तणावपूर्ण बनली. सुरुवातीला असे मानले जात होते की, कर्णधाराने हे मागील दोन सामन्यांमध्ये फलंदाजीची संधी न मिळालेल्या खेळाडूंना संधी देण्यासाठी केले. तथापि, हर्षित आणि अर्शदीप सारख्या गोलंदाजांना, ज्यांना पुढील सामन्यात खेळण्याचीही खात्री नाही, त्यांना फलंदाजीसाठी पाठवल्याने प्रश्न निर्माण झाले.
ओमानच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजीचा क्रम विस्कळीत केला व ठराविक अंतराने भारतीय फलंदाज बाद केले. भारताचा अर्धा संघ १३० धावांवर माघारी परतला. दरम्यान, यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसनने ४१ चेंडूत त्याचे तिसरे टी२० अर्धशतक पूर्ण केले. तो ५६ धावांवर बाद झाला. त्यांच्याशिवाय, तिलक वर्मा २९, अक्षर पटेल २६ आणि शिवम दुबेने पाच धावा केल्या, तर हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक धाव केली. हार्दिक व अर्शदिप एकसारखेच नॉन स्ट्राईकींग एंडला धावबाद झाले. असा प्रकार टि२० आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रथमच घडला. हर्षित राणा १३ धावांवर नाबाद राहिला. ओमानकडून शाह फैझल, जितेन रामानंदी आणि आमिर कलीम यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
कर्णधार जतिंदर सिंग आणि आमिर कलीम यांनी एक भक्कम पाया रचला. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली, जी नवव्या षटकात कुलदीप यादवने तोडली. त्याने भारतीय वंशाच्या खेळाडू जतिंदरला ३२ धावांवर बाद केले. त्यानंतर आमिरला हम्माद मिर्झा येऊन सामील झाला. दोघांनी ९३ धावांची मोठी भागीदारी केली. या दोन्ही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीचा कमकुवतपणा उघडकीस आणला. या अर्धशतकी भागीदारीने ओमानला १५० च्या जवळ नेले. तथापि, हर्षित राणाने डावाच्या १८ व्या षटकात हार्दिक पंड्याकडून आमिरला सीमारेषेवर झेलबाद केले. तो ६४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. या दरम्यान, त्याने ३८ चेंडूत त्याच्या टी२० कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर हम्मादने ३० चेंडूत अर्धशतक झळकविले आणि ५१ धावांची खेळी खेळून बाद झाला. २० व्या षटकात अर्शदीप सिंगने विनायक शुक्लाची विकेट घेऊन मोठी कामगिरी केली. तो टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०० बळी पूर्ण करणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. या सामन्यात भारताने एकूण आठ गोलंदाजांना संधी दिली, त्यापैकी हार्दिक, अर्शदीप, हर्षित आणि कुलदीप यांना प्रत्येकी फक्त एक बळी घेता आला.
सुपर चार टप्प्याची सुरुवात शनिवारपासून सुरू होत आहे. भारतीय संघाचा रविवारी पाकिस्तानशी सामना आहे. यापूर्वी १४ सप्टेंबर रोजी गट साखळीत दोन्ही संघ आमनेसामने आले होते, जिथे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानला सात गडी राखून पराभूत केले होते. त्या सामन्यानंतर बराच गदारोळ झाला. आता पाकिस्तानविरूध्द पुन्हा एक सामना होणार असून त्या सामन्यात कोण जिंकेल हा मोठा औत्सुक्याचा विषय असला तरी सामन्यातील वातावरण कसे राहाते ? याकडे समस्त क्रिकेट जगताचे लक्ष लागून आहे.
@डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२.

