महात्मा फुले चौकात माल्यार्पण, महिला मंडळाच्या वर्धापनदिनी रांगोळी स्पर्धांनी वेधले लक्ष.
एरंडोल — शहरातील क्रांतीसूर्य महात्मा फुले चौकात महात्मा फुले युवा क्रांती मंच व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.
स्त्री शिक्षण व समाजसुधारणेसाठी फुले दांपत्याने केलेल्या ऐतिहासिक कार्याला मान्यवरांनी आपल्या मनोगतातून उजाळा दिला. कार्यक्रमानिमित्त ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधून भव्य रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विविध वयोगटांतील महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत फुले दांपत्याच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग रांगोळीच्या माध्यमातून साकारले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, समन्वय समितीचे माजी अध्यक्ष रमेश महाजन, सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन, माजी नगरसेवक रुपेश माळी, नगरसेवक अनिल महाजन, मयूर महाजन, रवींद्र महाजन, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, माजी उपनगराध्यक्षा शकुंतला अहिरराव तसेच नगरसेविका व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महात्मा फुले युवा क्रांती मंचचे सदस्य व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.



