नगराध्यक्ष, नगरसेविकांसह सुवर्णविवाह व वाढदिवस साजरे; सामाजिक उपक्रमांना गौरव.
एरंडोल — पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने शहरात अत्यंत सुसंस्कृत व भावनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. साने गुरुजी लिखित “खरा तो एकच धर्म” या प्रार्थनेने आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर तर प्रमुख पाहुण्या म्हणून नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. गीतांजली ठाकूर उपस्थित होत्या. यावेळी नगराध्यक्षांसह उपस्थित नगरसेविकांचा महिला संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यात विवाहाला ५० वर्षे पूर्ण झालेल्या २२ महिलांचा तसेच डिसेंबर महिन्यात वाढदिवस असलेल्या ८ महिलांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ महिला संघाच्या उपाध्यक्षा शकुंतला अहिरराव यांनी सुवर्णविवाही अनुभव मनोगतातून मांडले.
नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी संघाच्या कार्याचे कौतुक करून देणगी जाहीर केली व भविष्यात सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. नीता तिवारी व शालिनी कोठावदे यांनीही देणगी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदा शुक्ला यांनी केले, प्रास्ताविक अध्यक्षा शोभा साळी तर आभार शशी पांडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला संघाच्या सर्व भगिनींनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी नाश्त्याचे प्रायोजक आशाताई पाटील (वावडदे) व स्वाती पाटील यांचा सत्कार करून पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



