अकोले | प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील अतिदुर्गम फोफसंडी गावाला रेडिओ स्टेशनच्या माध्यमातून जगाच्या नकाशावर आणण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून, यासाठी सन २०२८ मध्ये जगभरातील नामांकित शास्त्रज्ञांना शिर्डी येथे निमंत्रित करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन नेवासा नगरपंचायतचे नूतन नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांनी केले.
अकोले तालुका हा क्रांतिकारकांचा समृद्ध इतिहास असलेला, तर नेवासा तालुका सांप्रदायिक आणि आध्यात्मिक शक्तीचा केंद्रबिंदू आहे. या दोन्ही तालुक्यांची ऊर्जा एकत्र आल्यास भविष्यात भरीव आणि दिशादर्शक काम उभे राहू शकते, असा विश्वासही डॉ. घुले यांनी व्यक्त केला.
नेवासा नगरपंचायतचे नूतन नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांनी अकोले नगरपंचायतीस सदिच्छा भेट दिली. यावेळी अकोले नगरपंचायतचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक बाळासाहेब मुळे, भाजपचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब वाकचौरे, मुख्याधिकारी धनश्री पवार, नगरसेवक विजय पवार, आरिफ शेख, नवनाथ शेटे, अमोल वैद्य, नेवासा येथील बांधकाम कामगार आरोग्य योजनेचे कार्यकर्ते अनंत पवार, उबेद शेख, सिद्धेश देशमुख, बांधकाम कामगार प्रतिनिधी पांडुरंग मते, सामाजिक कार्यकर्ते अनिकेत ढोकणे, उत्तम शेणकर यांच्यासह नगरपंचायतचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. घुले पुढे म्हणाले की, विद्यार्थी परिषदेच्या कार्यातून सामाजिक जीवनात प्रवेश केला. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी अनेक लढे दिले. वेळप्रसंगी विद्यापीठ बंद आंदोलन करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला. नेवासा येथे समर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागात आतापर्यंत ४४२ नेत्रदान शिबिरे आयोजित करून समाजात नेत्रदानाबाबत जनजागृती केली.
तसेच ३० हजार बांधकाम मजुरांचे संघटन करून त्यांना आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला. नेवासा तालुका इकोझोन असल्याने ४० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही करण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले.
राजकारणाची कोणतीही महत्त्वाकांक्षा नसताना केवळ सामाजिक कार्याच्या प्रेरणेतून आपण काम करत राहिलो. मात्र महायुतीकडून नेवासा नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी माझ्या नावावर शिक्कामोर्तब झाला. प्रस्थापित शक्तींविरुद्ध लढा देत, लोकांनी ही निवडणूक हातात घेतली आणि २ हजार मताधिक्याने विजय मिळवून दिला, असे अनुभवही त्यांनी सांगितले.
मुळात सामाजिक कार्यकर्त्याचा पिंड असल्याने वर्षभरापूर्वी अभिनव शिक्षण संस्थेत व्याख्यान देण्याची संधी मिळाली. यावेळी अकोले नगरपंचायतीचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या नेवासा येथील मंदिरास भेट द्यावी, असे निमंत्रणही डॉ. घुले यांनी दिले.
यावेळी नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांनी डॉ. करणसिंह घुले यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरी क्लबचे असिस्टंट गव्हर्नर अमोल वैद्य यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याधिकारी धनश्री पवार यांनी केले.

