shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तेहत्तीस वर्षांपूर्वी या राज्यपालांनी दिला होता तडकाफडकी राजीनामा* उमेश काशीकर यांचे मनोगत !!



जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

देशातील हरितक्रांतीचे जनक असा लौकिक असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भारतरत्न सी सुब्रमण्यम यांनी तेहत्तीस वर्षांपूर्वी याच आठवड्यात आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता ! 

गोवा येथे भरलेल्या ८० व्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या उदघाटन सत्रानंतर वैज्ञानिकांशी खाजगीत बोलताना सुब्रमण्यम यांनी तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांच्या कार्यशैलीवर टीका केली होती. 

वैज्ञानिकांशी अनौपचारिक गप्पा सुरु असताना त्या ठिकाणी  एक पत्रकार देखील  उपस्थित आहे याची कल्पना नसल्याने सुब्रमण्यम यांनी कृषी संदर्भातील एका प्रलंबित फाईलबाबत नरसिंह राव यांच्या कार्यशैलीबद्दल टीका केली होती. 

दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये पंतप्रधानांबाबत केलेले भाष्य बातमीच्या रूपाने प्रसिद्ध झाले आणि सुब्रमण्यम यांनी तेथूनच राज्यपाल पदाचा राजीनामा पंतप्रधान व राष्ट्रपतींकडे पाठवून दिला. 

हा किस्सा सी सुब्रमण्यम यांनी आपले आत्मचरित्र 'हॅन्ड ऑफ डेस्टिनी' (खंड तीन) लिहिला आहे.  

*'हॅन्ड ऑफ डेस्टिनी'*

"आता आपल्या राज्यपालपदाच्या कारकिर्दीतल्या अंतिम टप्प्याकडे मी येतो—तो म्हणजे ‘प्रसिद्ध’ गोवा प्रकरण आणि माझा राजीनामा !!  

पंतप्रधान नरसिंह राव गोव्यात होणाऱ्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन करणार होते. उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्यासाठी आणि अनेक तसेही वैज्ञानिकांशी माझे पूर्वीपासूनच घनिष्ट संबंध असल्याने त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी मी देखील तेथे गेलो होतो."

"उद्घाटन समारंभानंतर चहापानाच्यावेळी मी नरसिंह राव यांना ‘प्रॉस्पेरिटी 2000’ प्रकल्पाशी संबंधित 'स्मॉल फार्मर्स अ‍ॅग्री-बिझनेस कन्सॉर्शियम'बाबत काही निर्णय झाला का, असे विचारले. 

याचे कारण म्हणजे हा विषय बराच काळ प्रलंबित होता. 

त्यांनी होकार दिला. 

त्यानंतर माझ्या शेजारी उभे असलेले तत्कालीन नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष प्रणब मुखर्जी यांना मी (पंतप्रधानांचा) तो निर्णय काय आहे, असे विचारले. 

प्रणब यांनी सावधपणे राव यांच्याकडे वळून त्यांना सांगितले, “ती फाईल अजूनही तुमच्या टेबलावर आहे.” 

पंतप्रधान थोडेसे वरमले दिसले; मला मात्र त्यांचे ती कृती अजिबात आवडली नाही.

एव्हाना मी अगोदरच थकलो होतो आणि माझा मुक्काम असलेल्या राजभवनाकडे प्रस्थान करण्यासाठी गाडीत बसणार होतो. 

तेवढ्यात काही वैज्ञानिक माझ्याकडे आले आणि बैठकीत मी मांडलेल्या काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी थोडावेळ चहापानाला यावे अशी विनंती केली. 

चर्चेला मोजकेच ज्येष्ठ वैज्ञानिक उपस्थित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कसे कुणास ठाऊक परंतु चर्चा पंतप्रधानांच्या निर्णय घेण्याच्या विषयाकडे वळली.

माझी जखम ताजीच होती.  ‘प्रॉस्पेरिटी 2000’सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पाबाबत  निर्णय घेण्याला होत असलेल्या विलंबाबद्दल आपली निराशा मी वैज्ञानिकांजवळ बोलून दाखवली.

(‘प्रॉस्पेरिटी 2000’ ही योजना मी पंतप्रधान नरसिंह राव यांच्यासमोर मांडली होती आणि पंतप्रधान तसेच संबंधित सचिवांसोबत झालेल्या बैठकीत योजनेबाबत विस्तृत चर्चा झाली होती. पंतप्रधान आणि नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष प्रणब मुखर्जी यांनी या संदर्भात अनेक बैठकी घेतल्या होत्या.  फेब्रुवारी १९९२ मध्ये सरकारने ही योजना स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि ती आठव्या पंचवार्षिक योजनेत समाविष्ट करण्यात आली. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी ‘स्मॉल फार्मर्स अ‍ॅग्री बिझनेस कन्सॉर्शियम’ ही संस्था देखल स्थापन करण्यात आली.)  

उपरोक्त फाईल वर्षभराहून अधिक काळ पंतप्रधानांकडेच प्रलंबित असल्याची खंत मी (उपस्थित वैज्ञानिकांजवळ) बोलून दाखवली. 

छोट्या मोठ्या उद्घाटन कार्यक्रमांसाठी पंतप्रधान आपला वेळ कसा वाया घालवत आहेत आणि त्यांच्याकडे कितीतरी जास्त खाती आहेत, याबद्दल देखील मी भाष्य केले. 

पंतप्रधानांचा वेळ अमूल्य असतो आणि क्षुल्लक औपचारिक कार्यक्रमांत तो वाया जाणे देशाला परवडणारे नाही, असेही मी बोललो.  

त्या कक्षात उपस्थितांमध्ये स्थानिक वृत्तपत्राचा एक प्रतिनिधी होता, याची मला जराही कल्पना नव्हती. 

दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात बातमी झळकली: “राज्यपालांनी पंतप्रधानांना सुनावले.”

बातमी वाचल्यावर मला अतिशय अवघडल्यासारखे वाटले.

एखाद्या राज्यपालाने पंतप्रधानांच्या कार्यपद्धतीवर उघडपणे टीका करणे आणि ती वृत्तपत्रात प्रसिद्ध होणे, हे सर्वथा चुकीचे आहे, असे मला वाटले. 

माझ्यासोबत आलेल्या माझ्या मुलीला आता मात्र मी राजीनामा देणार असल्याचे सांगितले. 

तात्काळ राष्ट्रपतींना उद्देशून मी राजीनाम्याचे पत्र तयार केले.

गोव्यात नेमके काय घडले याचे स्पष्टीकरण देणाऱ्या जोडपत्रासह ते मी पंतप्रधानांकडे पाठवले आणि वृत्तपत्रातील त्या ‘आक्षेपार्ह’ बातमीचे कात्रण देखील सोबत जोडले. 

उपस्थितांमध्ये पत्रकार उपस्थित असल्याची आपल्याला कल्पना नव्हती; तरीही आपली पंतप्रधानांवरील टीका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्याने नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण राजीनामा सादर करीत आहो. 

माझ्या राजीनाम्याचे कारण आपल्याशी संबंधित असल्याने राष्ट्रपतींकडे पत्र आपल्या मार्फत पाठवत असल्याचे देखील नमूद केले आणि राष्ट्रपतींना या संदर्भात आपणच योग्य ती शिफारस करण्याची विनंती केली.

राजीनाम्याचे पत्र फॅक्स केल्यानंतर दुसऱ्या दिवशी, पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार मी दिल्लीत होतो. त्या सकाळी पंतप्रधानांना माझे पत्र मिळाले होते. पूर्वनियोजित भेटीनुसार मी त्यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली. परंतु त्यांच्या निर्णयावर परिणाम होऊ नये म्हणून मी राजीनाम्याचा विषय आपणहून काढला नाही; त्यांनीही तो काढला नाही. 

दुपारी मी राष्ट्रपती शंकरदयाल शर्मा यांची देखील भेट घेतली; पण राजीनाम्याचा मुद्दा तेथेही काढला नाही, कारण राजीनामा योग्य प्रक्रियेनुसार पुढे जावा, असे माझे मत होते. 

दुसऱ्या दिवशी मी मुंबईला परतलो. त्या संध्याकाळी साडेसात वाजता पी. सी. अलेक्झांडर यांचा मला बंगळुरूहून फोन आला. राजीनामा का दिला, अशी त्यांनी विचारणा केली.  

थोड्याच वेळापूर्वी रेडिओवर माझा राजीनामा स्वीकारल्याची घोषणा झाल्याचे देखील त्यांनी मला सांगितले. तसेच, यापूर्वी त्यांना (अलेक्झांडर यांना) उत्तर प्रदेशचे राज्यपाल म्हणून लखनौला जाण्याचा सल्ला देण्यात आला होता, परंतु आता मात्र त्याऐवजी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा कार्यभार घेण्याचे सांगण्यात आले आल्याचे त्यांनी सांगितले. दोन दिवसांनी राष्ट्रपतींकडून राजीनामा  स्वीकृतीबाबत पत्र मला मिळाले." 

सी सुब्रमण्यम यांना 'आपण तसे बोललो नाही' किंवा 'आपल्या शब्दांचा विपर्यास करण्यात आला', असे स्पष्टीकरण देण्याचे अनेकांनी सुचवले. परंतु 'आपण तसे बोललो' यावर सुब्रमण्यम ठाम राहिले. धन्य ते तत्वनिष्ठ लोक  !

इंडियन सायन्स काँग्रेस दिनांक ३ ते ८ जानेवारी १९९३ या कालावधीत झाले होते. त्यामुळे या घटनेला सध्या सुरु असलेल्या आठवड्यात ३३ वर्षे पूर्ण होत आहेत.
close