“जुळळी गाठ गं” मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य
शिर्डी | प्रतिनिधी
अभिनय म्हणजे केवळ संवाद बोलणे नव्हे, तर भूमिकेत पूर्णपणे विरघळून जाणे. हेच पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवत आहेत अभिनेता प्रकाश धोत्रे. Sun Marathi या लोकप्रिय वाहिनीवरील गाजत असलेली मालिका “जुळळी गाठ गं” सध्या घराघरात पोहोचली असून, या मालिकेत प्रकाश धोत्रेंचा अभिनय प्रेक्षकांची विशेष दाद मिळवत आहे.
अतिशय संयत, मितभाषी पण परिणामकारक अभिनयशैली ही प्रकाश धोत्रेंची खरी ओळख आहे. संवादांपेक्षा डोळ्यांतून भावना पोहोचवण्याची त्यांची क्षमता ही आजच्या मालिकाविश्वात दुर्मिळ म्हणावी लागेल. त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक प्रवेशाला एक वेगळीच वजनदार छाप पडते.
ग्रामीण मातीचा गंध जपणारा, वास्तवाशी जोडलेला आणि प्रामाणिक अभिनय करणारा कलाकार म्हणून प्रकाश धोत्रे यांचं नाव आदराने घेतलं जातं. “जुळळी गाठ गं” मधील त्यांची भूमिका ही केवळ कथानकाची गरज नाही, तर मालिकेचा आत्मा ठरत असल्याचं चित्र आहे.
प्रकाश धोत्रे साहेबांचा अभिनय कुठेही अतिरेकी वाटत नाही. तो सहज आहे, नैसर्गिक आहे आणि म्हणूनच प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारा आहे. हीच गोष्ट त्यांना इतर कलाकारांपेक्षा वेगळं स्थान देऊन जाते.
आजच्या स्पर्धेच्या युगातही सातत्य, शिस्त आणि अभिनयाशी प्रामाणिक राहून त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळेच नवोदित कलाकारांसाठी ते एक प्रेरणास्थान ठरत आहेत.
Sun Marathi वरील “जुळळी गाठ गं” मालिकेमुळे प्रकाश धोत्रेंच्या अभिनयाला नवी ओळख मिळत असून, येत्या काळातही त्यांच्या दमदार भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.
— शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह

