विद्यार्थ्यांना बँकिंग व्यवहारांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन...
एरंडोल : येथील यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, एरंडोल येथील अर्थशास्त्र विभागातर्फे महाराष्ट्र ग्रामीण बँक, एरंडोल शाखेला शैक्षणिक भेट देण्यात आली. एस.वाय.बी.ए. व टी.वाय.बी.ए. अर्थशास्त्रच्या विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामकाजाची माहिती मिळावी या उद्देशाने या भेटीचे आयोजन करण्यात आले.
भेटीदरम्यान बँकेचे शाखा व्यवस्थापक मा. नितीन पाटील यांनी विद्यार्थ्यांना बचत खाते व चालू खाते यांतील फरक, विविध प्रकारच्या कर्ज सुविधा, बँकेतील व्यवहार पद्धती, एटीएम सेवा, ऑनलाईन व्यवहार तसेच डिजिटल बँकिंगमधील सुरक्षिततेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
असिस्टंट बँक मॅनेजर मा. सुशांत घोळके यांनी आर्थिक साक्षरतेचे महत्त्व स्पष्ट करून भविष्यातील आर्थिक नियोजनाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी बँकेतील विविध विभागांना भेट देऊन प्रत्यक्ष कामकाजाची माहिती घेतली व शंकांचे निरसन करून घेतले.
या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. अमितदादा पाटील, प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील व उपप्राचार्य डॉ. अरविंद बडगुजर यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. एस. वानखेडे व प्रा. विजय गाढे यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी बँकेचे कॅशियर मा. मयूर पाटील, बँक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शैक्षणिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.



