जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
इराण - इस्त्रायल युद्धाच्या १४ दिवसांत गल्फ राष्ट्रांना समजले की, अमेरिकेच्या बाजूने उभे राहिल्याने इस्राईलचा धोका कमी होत नाही. तसेच इराणशी वैर परवडणारे नाही. इराणच्या युध्दनितीत गल्फ राष्ट्रांना सोबत घेण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे इराणने गल्फ राष्ट्रांत जास्तीत जास्त नुकसान अमेरिकेचेच होईल याची काळजी घेतली आहे.
कतारच्या राजघराण्याने ट्रम्पला सुमारे ३००० कोटी रुपयांचे विमान भेट दिले होते. आता कतारमधील अमेरिकन दूतावास बंद झाला आहे, कारखाने बंद आहेत, एलपीजी प्लांट बंद आहे आणि इराणचे हल्ले होत असल्याच्या बातम्या सुरुच आहेत.
इस्त्रायलने, इराण मधील सर्वात जुन्या बँकेवर हल्ला केल्यानंतर इराणने दुबईच्या इंटरनॅशनल फायनान्सियल सेंटरवर हल्ला केला, जिथे एचएसबीसी, सिटी बँक आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँकांची ऑफिसेस आहेत. इराणने गल्फ राष्ट्रांना मेसेज दिलाय की, 'अमेरिका त्यांच्या सुरक्षेची हमी देऊ शकत नाही. अमेरिकेचा नाद सोडा.'
इराकच्या हवाई क्षेत्रात अमेरिकेच्या दोन केसी-१३५ स्ट्रॅटोटँकर हवाई इंधन भरणाऱ्या विमानांना लक्ष्य केले गेले. एक विमान पूर्णतः क्रॅश झाले, त्यातील सहा क्रू मेंबर्स मृत्युमुखी पडल्याची पुष्टी झाली आहे. दुसरे विमान क्षतिग्रस्त अवस्थेत उतरले. प्रत्येक विमान सुमारे १६६ कोटी रुपये किमतीचे आहे. (जुन्या दरांनुसार)
इराकमधील इस्लामिक रेझिस्टन्सने (इराणचे समर्थक) या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. मात्र अमेरिकन लष्कर म्हणतेय की विमान 'फ्रेंडली टेरिटरी'त क्रॅश झाले, पण हल्ला कोणाचा झाला हे सांगत नाही. ना शत्रूचा, ना मित्राचा! निव्वळ फेक न्यूज देवून अमेरिकन नागरिकांसह जगाला मूर्ख बनवले जात आहे.
इराणचे नवे सुप्रीम लीडर सय्यद मुस्तफा हुसेनी खामेनींनी गल्फ राष्ट्रांना संदेश दिलाय की, अमेरिका शांतता किंवा सुरक्षा हमी देऊ शकत नाही. आपल्या भूमीवरील अमेरिकन लष्करी तळ तातडीने बंद करा. अमेरिकेन दुतावास बंद करुन त्यांचे राजदूत हाकला.
इराणवर हल्ला करणाऱ्या अमेरिकेशी संबंध ठेवण्याचा पुन्हा एकदा विचार करा. इराणला १५ शेजारी देशांशी चांगले संबंध हवे आहेत. नाहीतर हॉर्मुझ बंद राहील.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धाच्या १३ दिवसांनंतर इराणच्या राष्ट्रपतींना फोन केला, चिंता व्यक्त केली, पण खामेनींच्या हत्येची निंदा केली नाही. मे २०२४ मध्ये इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वैयक्तिकरित्या ट्विट करून शोक व्यक्त केला होता.
मात्र इराणचे सुप्रीम लीडर अयातोल्ला खामेनेई यांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा विदेश मंत्री एस. जयशंकर यांनी वैयक्तिक स्टेटमेंट, ट्विट किंवा शोक व्यक्त केला नाही. ५ मार्च २०२६ रोजी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी इराणच्या दूतावासात जाऊन भारत सरकार व जनतेच्या वतीने शोक व्यक्त केला. यामुळे इराण व भारत संबंध पूर्वीसारखे राहीलेले नाहीत.
मात्र भारतीय गोदी मेडीया होमुर्झच्या सामुद्रधुनीतून भारतीय जहाजे पाठविण्यास इराणने विशेष परवानगी दिल्याचे भारतीय माध्यमे व गोदी मेडीया सांगते. पण इराणने अशा प्रकारचा कोणताही दावा अधिकृतपणे केलेला नाही. इराणी माध्यमांमधे याविषयी चकार बातमी नाही.
इराणच्या भारतीय राजदूतांच्या अर्धवट वाक्यांच्या आधारे इराणने भारताला विशेष वागणूक देणार असल्याचे मान्य केल्याचे सांगितले जाते आहे. जे पूर्णतः खोटं आहे.
होमुर्झच्या सामुद्रधुनीतून परवानगी मिळत नसल्याने जगभरातील सुमारे १,००० जहाजे बंदरांमध्ये उभी आहेत. अमेरिका आणि इस्राईल या देशांच्या मित्रराष्ट्रांना एक थेंबही तेल दिले जाणार नाही. ही इराणची अधिकृत भूमिका आहे. भारताच्या तटस्थ तथा अलिप्ततावादी धोरणाचा मोदीजींच्या गळेपडू धोरणाने पुरता फज्जा उडालेला आहे.
गल्फ राष्ट्रांचे हवाई क्षेत्र पूर्णतः बंद आहे. गल्फ राष्ट्रांत अडलेलेले भारतीय पर्यटक कसेबसे भारतात परतू शकलेत. पण नोकरी, व्यवसायानिमित्त गल्फ राष्ट्रांत असलेल्या भारतीयांची संख्या सुमारे १ कोटी असल्याचे भारतीय संसद सांगतेय.
सध्या गल्फ राष्ट्रांतील भारतीय केवळ सौदी अरेबियाचा व्हिसा घेऊन सौदी मार्गे केरळ किंवा आंध्र प्रदेश या हवाई मार्गाने भारतात परत येऊ शकतात. यासाठी अतिरिक्त १ लाख रुपये प्रतिप्रवासी खर्च व सुमारे दोन दिवसांचा वेळ लागतोय. प्रवासात हल्ल्याची भिती ते वेगळेच. या भारतीयांना सुरक्षेची हमी देण्यात भारत सरकार कमी पडतंय.
इराण बेचिराख झाले आहे तर इस्त्रायलसह गल्फ राष्ट्रांचे हवाई क्षेत्र का बंद आहे? याचे उत्तर नेतान्याहू, ट्रंप किंवा गोदी मेडीयाकडे नाही. लबाडी करुन जनतेला फसवणारे सगळे नेते इराणने तोंडावर पाडलेत. इराणचे लष्कर प्रमुख सांगतात या युध्दसंधीची वाट आम्ही २० वर्षे बघत होतो. पुढची १० वर्षे आम्ही कडवा प्रतिकार करु शकतो.
खामेनेईंनी प्रत्येक प्रशासकीय व राजकीय पदांसाठी प्रत्येकी चार उत्तराधिकारी आधीच तयार करुन ठेवलेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत युध्द अमेरिका किंवा इस्त्रायलच्या अटींवर थांबणार नाही. इराणने स्वतःच्या अटी सांगितल्या आहेत. ज्या मान्य करणे म्हणजे ट्रंम्प आणि नेतान्याहूंचा पराभव आहे.
सामान्य माणसं भरडली जात असताना ट्रंम्प आणि नेतान्याहू यांच्या सारख्या नेत्यांच्या अट्टाहासापायी युध्द सुरु आहे. ज्या लोकांनी असे नेते निवडले ते लोक देखील या युध्दासाठी तितकेच जबाबदार आहेत.

