३, ४ व ५ एप्रिल रोजी मोफत शस्त्रक्रिया शिबिर; १०० रुग्णांवर उपचार होणार.
जळगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान, रोटरी ई-क्लब ऑफ गोदावरी ईलाईट तसेच डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३, ४ व ५ एप्रिल रोजी मोफत तिरळेपणा व पडलेल्या पापणीवरील शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून जळगाव जिल्हा तिरळेपणा मुक्त करण्याचा संकल्प असल्याचे डॉ. एन. एस. आर्विकर यांनी सांगितले.
या शिबिरासाठी पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानचे प्रमुख नेत्रतज्ज्ञ व अध्यक्ष डॉ. मधुसूदन झंवर, सचिव व प्रमुख सर्जन डॉ. राजेश पवार, ओक्युलोप्लास्टी सर्जन डॉ. रमेश भांगे, प्रमुख भूलतज्ज्ञ डॉ. श्यामकांत कुलकर्णी, प्रमुख संयोजक डॉ. वैभव वनारसे, डॉ. सचिन गाडे, डॉ. संजीव राठोड, डॉ. आनंद खडके, डॉ. मनोज भायगुडे, डॉ. ललित शहा, डॉ. प्रवीण जगताप, डॉ. सचिन बगाडे, डॉ. उदय कुरुडकर, डॉ. अनिल वायकुळे, डॉ. राजेंद्र लोहारे, डॉ. नितीन भालेराव, डॉ. रवी देशमुख, भूलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र जाधव व डॉ. बंदल यांची तज्ञांची टीम पुणे येथून येणार आहे.
तिरळेपणा हा लपवण्याचा नव्हे तर उपचार करण्याचा आजार असून योग्य वेळी शस्त्रक्रिया केल्यास रुग्णांचा आत्मविश्वास व दृष्टी दोन्ही सुधारतात, असे डॉ. आर्विकर यांनी सांगितले. समाजातील गरजू रुग्णांपर्यंत दर्जेदार नेत्रसेवा पोहोचविण्यासाठी शासकीय यंत्रणा व सामाजिक संस्थांचे संयुक्त कार्य महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सदर शस्त्रक्रिया डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे होणार असून सलग तीन दिवसांत सुमारे १०० रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यासंदर्भात आज वैद्यकीय महाविद्यालयात बैठक पार पडली. बैठकीस अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, डॉ. रेणुका पाटील, डॉ. निखील चौधरी तसेच नेत्ररोग विभागाचे डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.


