shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मोबाईलवर बोलत असताना पडली तरुणी; मणक्यावरील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी, डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील तज्ज्ञांची कामगिरी.

मोबाईलवर बोलत असताना पडली तरुणी; मणक्यावरील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी, डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील तज्ज्ञांची कामगिरी.

पहिल्या मजल्यावरून पडल्याने चालणे झाले होते बंद; वेळेवर शस्त्रक्रियेमुळे तरुणी पुन्हा उभी राहिली – महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार.

जळगाव (प्रतिनिधी)

मोबाईलवर बोलत असताना पहिल्या मजल्यावरून खाली पडून मणक्याला गंभीर दुखापत झालेल्या २० वर्षीय तरुणीवर यशस्वी शस्त्रक्रिया करून तिचे चालणे पुन्हा शक्य करण्यात डॉक्टरांना यश आले. ही जटिल शस्त्रक्रिया जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात मेंदू व मणका विकार तज्ज्ञांच्या टीमने यशस्वीपणे पार पाडली.

यावल तालुक्यातील आफरीन तडवी (वय २०) ही तरुणी घरी मोबाईलवर बोलत असताना अचानक तोल जाऊन पहिल्या मजल्यावरून खाली पडली. या अपघातात तिच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. पडताना झालेल्या तीव्र आघातामुळे तिच्या पायांची ताकद कमी झाली आणि ती उभी राहू शकत नव्हती. कुटुंबीयांनी तातडीने तिला जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले.

“मणक्याच्या दुखापतीत वेळेवर योग्य निदान आणि तातडीची शस्त्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते. या रुग्णाला वेळेत उपचार मिळाल्यामुळे मज्जातंतूंवरील दबाव कमी करण्यात यश आले आणि तिच्या पायांची ताकद पुन्हा पूर्ववत झाली. उशीर झाला असता तर कायमस्वरूपी अपंगत्व येण्याची शक्यता होती.”
— डॉ. प्रितम दास, डॉ. उल्हास पाटील रुग्णालय


रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मेंदू व मणका विकार तज्ज्ञ डॉ. विपुल राठोड यांनी तिची सखोल तपासणी करून एमआरआयसह विविध तपासण्या केल्या. अहवालात कंबरेजवळील मणक्याच्या एल-२ व एल-३ या मणक्यांमध्ये गंभीर फ्रॅक्चर झाल्याचे निदान झाले. त्यामुळे मज्जातंतूंवर दबाव निर्माण होऊन पायातील ताकद कमी झाली होती.

रुग्णाची स्थिती गंभीर असल्याने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एल-२ ते एल-३ लॅमिनेक्टॉमी व एल-२ ते एल-४ पेडीकल स्क्रू फिक्सेशन ही अत्यंत नाजूक शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेत तुटलेल्या मणक्याला स्क्रू व रॉडच्या सहाय्याने स्थिर करण्यात आले.

ही शस्त्रक्रिया डॉ. विपुल राठोड, डॉ. अतुल जाधव, डॉ. प्रितम दास, डॉ. श्रुती खंडागळे व भूलतज्ज्ञ डॉ. शीतल फेगडे यांच्या टीमने यशस्वीपणे पूर्ण केली. शस्त्रक्रियेनंतर अतिदक्षता विभागात विशेष देखरेख ठेवण्यात आली. योग्य उपचार व फिजिओथेरपीमुळे आठवडाभरात तरुणीच्या पायातील ताकद परत येऊ लागली आणि काही दिवसांत ती स्वतः चालू लागली.

या संपूर्ण उपचाराचा खर्च महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत करण्यात आला असून रुग्णाला मोफत उपचार मिळाले.


close