एरंडोल : दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, एरंडोल येथील विज्ञान मंडळातर्फे 28 फेब्रुवारी ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ निमित्त ७ वी ऑनलाइन राष्ट्रीय विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. संस्थापक अध्यक्ष कै. दादासाहेब दिगंबर शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. यंदा या स्पर्धेला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत ९०० हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. बिहार, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, आसाम, हरियाणा, दिल्ली, कर्नाटकसह सुमारे २० राज्यांतील विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय ठरला.
उद्घाटन समारंभ संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब अमित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून एम. जे. महाविद्यालय, जळगाव येथील विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. मनोजकुमार चोपडा उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अरविंद बडगुजर, माजी प्रभारी प्राचार्य प्रा. एन. ए. पाटील, डॉ. एस. एम. साळुंखे, डॉ. उमेश गवई, कुलसचिव सोमनाथ बोरसे, प्रश्नमंजुषा समन्वयक डॉ. राहुल पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रथम वर्ष विज्ञान विभागाच्या विद्यार्थिनींच्या स्वागतगीताने झाली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
प्रास्ताविकात डॉ. एस. एम. साळुंखे यांनी स्पर्धेचा उद्देश स्पष्ट करत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, संगणकशास्त्र, गणित व सामान्य विज्ञान या विषयांवरील प्रश्नांचा समावेश असल्याचे सांगितले. या माध्यमातून विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वृद्धिंगत होऊन संशोधनाची प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विज्ञान दिनानिमित्त प्रमुख पाहुणे डॉ. चोपडा यांनी सी. व्ही. रमन यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत रमण परिणाम या महत्त्वपूर्ण शोधाविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी प्रात्यक्षिकांद्वारे विज्ञानाचे प्रयोग सादर करत विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करावा, असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात अमितदादा पाटील यांनी विज्ञान दिनाचे महत्त्व अधोरेखित करत प्रश्नमंजुषेमुळे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, स्पर्धात्मक वृत्ती आणि सामान्यज्ञान वाढीस लागते, असे सांगितले. विज्ञानाची भीती न बाळगता कुतूहलाने त्याचा अभ्यास करावा व नव्या संशोधनाची आवड जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सविता पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. उमेश गवई यांनी केले. विज्ञान मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. योगेश येंडाईत, प्रा. सागर विसपुते, प्रा. महेंद्र शिरसाट, प्रा. सुरज वसावे, प्रा. मुस्तकीम शेख, प्रा. उमेश सूर्यवंशी तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.


