इंदापूर :इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर येथील मराठी, हिंदी व इंग्रजी विभागाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी जागतिक मातृभाषा दिन व मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने तीनही विभागातील विद्यार्थ्यांनी आपल्या विषयांवर आधारित विविध आशयघन पोस्टरचे प्रदर्शन भरविले. विद्यार्थ्यांनी भाषेचे महत्त्व, मातृभाषेचे संवर्धन, मराठी भाषेचा इतिहास, तसेच विविध भारतीय भाषांची वैशिष्ट्ये यावर प्रभावी सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रज्ञा लामतुरे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून सांगली येथील कवी व मराठी भाषेचे अभ्यासक डॉ. संपत गायकवाड उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी इतिहास विभाग प्रमुख प्रा. बाळासाहेब शामराव सावंत सर होते.
आपल्या भाषणात डॉ. संपत गायकवाड म्हणाले, "जोपर्यंत कोणतीही भाषा समाजजीवनात वापरली जाते, बोलली जाते, तोपर्यंत त्या भाषेला मरण नसते. मराठी भाषा कदाचित संस्कृतपूर्व भाषा असू शकते. अनेक परकीय आक्रमणांनंतरही मराठी भाषेने आपले स्वत्व जपले आहे. इतर भाषांतील शब्दांचा स्वीकार करूनही तिने आपली ओळख टिकवून ठेवली आहे."
अध्यक्षीय भाषणात प्रा. बाळासाहेब सावंत यांनी सांगितले की, "भाषा म्हणजे त्या समाजाची संस्कृती असते. भाषा जिवंत राहिली तर तो समाज आणि त्याची संस्कृती टिकून राहते."
या प्रसंगी हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. शितल पवार व इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. रोहन व्यवहारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कला शाखाप्रमुख डॉ. भरत भुजबळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जीवन सरवदे, विज्ञान शाखाप्रमुख डॉ. शिवाजी वीर, प्रा. चांगदेव जाधव, प्रा. मनीषा गायकवाड, प्रा. मृदुल गायकवाड व इतर प्राध्यापक उपस्थित होते. अनेक विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रदर्शनाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. फिरोज शेख यांनी केले तर आभार प्रा. मुक्ता पिसे यांनी मानले.

