भक्तीनिवास परिसरात सापडलेली रोख रक्कम केली संरक्षण विभागात जमा; पोलीस उपाधीक्षक रोहिदास माळी यांच्यासह मान्यवरांकडून कौतुक
शिर्डी प्रतिनिधी :( तुषार महाजन)
श्री साईबाबा संस्थानच्या भक्तीनिवास परिसरात सापडलेले ८०० रुपये स्वतःजवळ न ठेवता, साई संस्थान एम्पलॉइज सोसायटीचे कर्मचारी संदीप रामभाऊ गोरडे यांनी प्रामाणिकपणे संस्थानच्या संरक्षण विभागात जमा केले आहेत. त्यांच्या या प्रामाणिक कृतीचे सर्वत्र स्वागत होत असून, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे.
सविस्तर वृत्त असे की, दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री साईबाबा संस्थानच्या भक्तीनिवास टोल नं. २० येथे सोसायटीचे कर्मचारी संदीप रामभाऊ गोरडे यांना ८०० रुपयांची रोख रक्कम सापडली. पैशांचा मोह न ठेवता त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता दुपारी १२:१५ वाजता ही रक्कम संरक्षण कार्यालयात नेऊन जमा केली. तेथे कर्तव्यावर असलेले कर्मचारी गोरक्षनाथ सोमासे आणि साई संस्थान सोसायटीचे सुपरवायझर मच्छिंद्र शिंदे यांच्याकडे त्यांनी हे पैसे सुपूर्द केले. या प्रामाणिकपणाबद्दल संरक्षण विभागाच्या वतीने गोरडे यांना अधिकृत आभारपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव:
संदीप गोरडे यांनी दाखवलेल्या या आदर्श आणि प्रामाणिकपणाबद्दल पोलीस उपाधीक्षक रोहिदास माळी यांनी त्यांचे सर्वप्रथम अभिनंदन केले. यासोबतच, साई संस्थान एम्पलॉइज सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार, व्हाईस चेअरमन पोपटराव कोते, संचालक रामजी गागरे आणि सचिव विलासराव वाणी यांनीही गोरडे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

