राहुरी फॅक्टरी | प्रतिनिधी | दि. २४ मे २०२६
अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा हद्दीत राहुरी फॅक्टरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील नगर–मनमाड महामार्गावर उभारण्यात येत असलेल्या पादचारी लोखंडी उड्डाणपुलाच्या कामात कोणत्याही प्रकारची निकृष्टता अथवा गुणवत्तेशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट आणि कडक इशारा सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढूस यांनी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना दिला आहे.
जवळपास दीड कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी पुलाचे काम सध्या वेगाने सुरू असून, आज कामाची प्रत्यक्ष पाहणी करताना ढूस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुलाच्या गुणवत्तेबाबत तीव्र भूमिका मांडत, “हा पूल शेकडो विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या सुरक्षेशी निगडित आहे. त्यामुळे ‘सुरक्षा प्रथम’ हे धोरण डोळ्यासमोर ठेवूनच काम झाले पाहिजे,” असे ठामपणे सांगितले.
ढूस पुढे म्हणाले की, “माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि माजी खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या सहकार्याने मागील पाच वर्षांपासून आम्ही या पुलासाठी सातत्याने पाठपुरावा केला. आज त्या प्रयत्नांना यश मिळत असून पुलाचे प्रत्यक्ष काम सुरू झाल्याने समाधान वाटत आहे.”
यापूर्वीही गावातील प्रवरा उजवा कालव्यावर माजी मंत्री बच्चू कडू यांच्या सहकार्याने सुमारे चाळीस लाख रुपये खर्चाचे चार लोखंडी पादचारी पूल उभारण्यात यश आले होते. आता नगर–मनमाड महामार्गावरील हा पाचवा पादचारी उड्डाणपूल उभारला जात असल्याचा अभिमान असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पुलाच्या बांधकामासाठी वापरले जाणारे लोखंड, वेल्डिंग, फाउंडेशन आणि इतर साहित्य अत्यंत दर्जेदार असणे आवश्यक असल्याचे सांगत ढूस यांनी, “कामात कुठेही हलगर्जीपणा अथवा निकृष्ट दर्जा आढळल्यास संबंधित ठेकेदार व अभियंत्यांवर थेट कारवाई करण्याची मागणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे करण्यात येईल,” असा इशाराही दिला.
दररोज शेकडो विद्यार्थी, महिला व नागरिक या पुलाचा वापर करणार असल्याने अगदी किरकोळ त्रुटीदेखील जीवघेणी ठरू शकते. त्यामुळे हा पूल केवळ विकासाचे प्रतीक नसून नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त करत ढूस यांनी कामाच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतः लक्ष ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.

