shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दिवंगत भारतबाई हलकुडे स्मृती बुद्धिबळ स्पर्धेत ऋतुराज धोत्रे यांचे दैदिप्यमान यश; १ लाखांचे पारितोषिक पटकावले

पुणे येथे दि. २४ मे ते २६ मे दरम्यान पार पडलेल्या प्रतिष्ठित “दिवंगत भारतबाई हलकुडे स्मृती बुद्धिबळ स्पर्धा २०२६” मध्ये Ruturaj Rishikesh Dhotre यांनी शानदार कामगिरी करत १७०० मानांकित खेळाडूंच्या प्रवर्गात प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांना तब्बल १ लाख रुपयांचे रोख पारितोषिक तसेच मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेत भारतासह विविध देशांतील नामांकित आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय बुद्धिबळपटूंनी सहभाग नोंदविला होता. मोठ्या बक्षीस रकमेची आणि उच्च दर्जाच्या स्पर्धात्मक वातावरणाची ही स्पर्धा बुद्धिबळ विश्वात विशेष महत्त्वाची मानली जाते. स्पर्धेमध्ये विविध मानांकित गट ठेवण्यात आले होते. त्यामध्ये १५५१ ते १७०० रेटिंग गटातील प्रथम क्रमांकासाठी १ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले होते.



“एलबीएचएम चेस फेस्टिव्हल २०२६” अंतर्गत आयोजित या स्पर्धेला देशभरातील बुद्धिबळपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. पुण्यातील उंद्री परिसरातील ध्रुव ग्लोबल स्कूल येथे या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ओपन, ब्लिट्झ, रॅपिड तसेच बी-१८०० अशा विविध गटांचा समावेश करण्यात आला होता.


ऋतुराज धोत्रे हे राष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळपटू असून त्यांनी यापूर्वी महाराष्ट्र राज्य संघाकडून तसेच जम्मू-काश्मीर राज्याचे प्रतिनिधित्व करत राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अत्यंत शांत, अभ्यासपूर्ण आणि रणनीतीपूर्ण खेळासाठी त्यांची बुद्धिबळ विश्वात ओळख निर्माण होत आहे.

ते Colonel Hrishikesh Dhotre यांचे द्वितीय पुत्र असून सध्या COEP Technological University, पुणे येथे अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत. शिक्षणासोबतच बुद्धिबळातील सातत्यपूर्ण सराव, आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

ऋतुराज यांच्या या यशामुळे कुटुंब, मित्रपरिवार, बुद्धिबळ प्रेमी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यातही ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 🌹♟️🏆🎉

००००

close