अहमदनगर, प्रतिनिधी : देशातील शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांचे हित आणि परीक्षा प्रक्रियेतील उत्तरदायित्व यांसाठी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते व शिक्षणतज्ज्ञ यांचे बेमुदत उपोषण १९ व्या दिवशी सुरू असून, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व जागरूक नागरिकांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन ॲड.पांडुरंग औताडे यांनी केले आहे.

लडाखमधील पर्यायी शिक्षण पद्धती, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक प्रश्नांवर सातत्याने कार्य करणारे सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर देशाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन सुरू केले आहे. राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा आणि भरती प्रक्रियेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची निष्पक्ष चौकशी व्हावी, परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणा कराव्यात, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहेत.

याशिवाय परीक्षा प्रक्रियेशी संबंधित तणाव आणि गैरव्यवहारांमुळे बाधित झालेल्या विद्यार्थी व कुटुंबीयांना न्याय मिळावा, तसेच भविष्यात विद्यार्थ्यांचा विश्वास अबाधित राहील अशी पारदर्शक व उत्तरदायी व्यवस्था निर्माण करावी, अशीही आंदोलनकर्त्यांची भूमिका आहे.

याबाबत बोलताना ॲड. पांडुरंग औताडे म्हणाले की, शिक्षण हा देशाच्या भवितव्याचा पाया असून विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्नांकडे समाजाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. शिक्षक, प्राध्यापक, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी संघटना आणि विविध सामाजिक संस्थांनी आंदोलनाची सविस्तर माहिती घेऊन या लढ्याला नैतिक पाठिंबा द्यावा.

प्रसारमाध्यमांनीदेखील‌ आंदोलनामागील भूमिका, मागण्या आणि विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित मुद्दे वस्तुनिष्ठपणे जनतेसमोर मांडावेत. शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनात समाजातील सर्व सजग घटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ॲड.पांडुरंग औताडे यांनी केले.
०००